अमरावती :अनाथांची माय म्हणून आपल्या हयातीत स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना जाऊन आता दोन वर्ष पूर्ण होत आहेत. यावेळी त्यांच्या संस्थेत आणि कुटुंबात वाद उफाळून आला आहे. सिंधुताई सपकाळ यांचे खासगी सचिव असणारे विनय मुकुंद नितवणे यांनी आपल्या नावासमोर वडील मुकुंद नितवणे यांचे नाव काढून सिंधुताई सपकाळ असं नाव राजपत्राद्वारे लावलं आहे. विनय नितवणे यांनी सिंधुताई सपकाळ यांचं नाव लावून त्यांचा आपण वारस असल्याचं सांगण्याबाबत सिंधुताई सपकाळ यांचे पुत्र अरुण सपकाळ यांनी आक्षेप घेतला आहे. या प्रकरणात अरुण सपकाळ यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अरुण सपकाळ यांनी या संपूर्ण प्रकरणासंदर्भात खास 'ईटीव्ही' भारत' शी बोलताना उलगडा केला.
असं आहे संपूर्ण प्रकरण : पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे खासगी सचिव असणारे विनय मुकुंद नितवणे हे मूळचे वर्धा येथील रहिवासी आहेत. सिंधुताई सपकाळ यांच्या पुण्यातील संस्थेचा कारभार ते पाहतात. सिंधुताई सपकाळ यांचं 4 जानेवारी 2021 रोजी निधन झालं. आता विनय नितवणे यांनी आपल्या नावासमोर नाव बदलून राजपत्राद्वारे सिंधुताई सपकाळ असं नाव लावलं आहे. जी मुलं अनाथ असतात अशा मुलांच्या नावासमोरच सिंधुताई सपकाळ यांचं नाव लावलं जातं असं अरुण सपकाळ यांचं म्हणणं आहे. विनय नितवणे यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेत काम करावं, समाजसेवा करावी यासंदर्भात आमचा कुठलाही आक्षेप नाही. मात्र ते अनाथ नसताना त्यांनी आपल्या नावासमोर सिंधुताई सपकाळ यांचं नाव लावलं यावर तीव्र आक्षेप असल्याचं अरुण सपकाळ म्हणाले. सिंधुताई सपकाळ यांच्यासोबत विनय नितवणे सतत राहायचे सिंधुताई सपकाळ यांच्यामुळं त्यांच्या अनेकांशी ओळखी झाल्या आहेत. आता सिंधुताई सपकाळ यांचे नाव लावून विनय नितवणे यांना नेमकं काय साध्य करायचं आहे, असा प्रश्न देखील अरुण सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.
आधी उच्च न्यायालयात घेतली धाव : या प्रकरणात सर्वात आधी मी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. यावर उच्च न्यायालयानं आधी खालच्या न्यायालयात याचिका दाखल करावी असं स्पष्ट केल्यावर आता अचलपूर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयानं विनय नितवणे यांना एक डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्यासंदर्भात नोटीस पाठवली होती. मात्र 1 डिसेंबरला ते न्यायालयात हजर झाले नाहीत. यामुळे त्यांना पुन्हा आपले स्पष्टीकरण देण्यासंदर्भात नोटीस पाठवली असल्याचं अरुण सपकाळ म्हणाले.
पुण्यातही करणार तक्रार : आमची आई पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर करून अनेकांची फसवणूक करण्याचा प्रकार विनय नितवणे यांच्याकडून केला जात आहे. यामुळे विनयच्या संदर्भात पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील मी तक्रार करणार असल्याचं अरुण सपकाळ म्हणाले.
बहिणीच्या भूमिकेवरही घेतला आक्षेप :सिंधुताई सपकाळ यांना एकूण चार मुलं आहेत. अमृत सपकाळ हा मोठा मुलगा असून ते वर्ध्याला राहतात. अरुण सपकाळ हे दुसऱ्या क्रमांकाचे असून ते चिखलदरा येथे सिंधुताई सपकाळ यांनी सर्वात आधी स्थापन केलेल्या अनाथ मुलींचा आश्रम सांभाळतात. तिसरा मुलगा संजय हे पुण्यात आहेत आणि चौथी मुलगी ममता ही पुण्यात माईंची संस्था सांभाळते. माझी बहीण ममताने आंतरधर्मीय लग्न केल्यामुळं मी अनेक वर्षांपासून तिच्याशी बोलत नाही. तिनं घेतलेला निर्णय आमच्या माईंना देखील पटला नव्हता. मात्र काही दिवसातच ती माईंकडे परत आली. आई म्हणून माईंनी तिला पदरात घेतलं. आज मात्र ममता पुण्यात माईंची संस्था सांभाळत असून विनय नितवणे याला ममताचं पाठबळ असल्याबाबत अरुण सपकाळ यांनी रोष व्यक्त केला.