अमरावती -जिल्ह्यातील तिवसा शहरात गेल्या चार वर्षांपासून अवैधरित्या बोगस पदवी दाखवून पश्चिम बंगालमधील एक बोगस डॉक्टर खासगी दवाखाना चालवत आहे. या डॉक्टरचा पर्दाफाश तिवसा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवन मालुसरे यांनी केला आहे. आज शनिवारी दुपारी १ वाजता दवाखान्यात छापा टाकून त्याला घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे. या कारवाईने वैद्यकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे बोगस डॉक्टरचा पर्दाफाश
जिल्ह्यातील तिवसा शहरात गेल्या चार वर्षांपासून अवैधरित्या बोगस पदवी दाखवून पश्चिम बंगालमधील एक बोगस डॉक्टर खासगी दवाखाना चालवत आहे. या डॉक्टरचा पर्दाफाश तिवसा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवन मालुसरे यांनी केला आहे.
शहरातील सराफ लाईनमध्ये गेल्या चार वर्षांपासून पश्चिम बंगाल येथील डॉ. अविक मंडल (वय २९) या बोगस डॉक्टरचा साई सरकार नावाचा खासगी दवाखाना आहे. तो मूळव्याध, भगंदर, गुप्तरोग या सर्व आजारांवरील रुग्णांवर अवैधरित्या उपचार करायचा. मात्र, तिवसा शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवन मालुसरे यांनी आज शनिवारी त्याच्या या दवाखान्याची तिवसा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह झडती घेतली असता, त्याच्याकडे डॉक्टरची बोगस पदवी दिसून आली. तसेच बोगस कागदपत्रेही त्याच्याकडे सापडली. त्यामुळे हा डॉक्टर बोगस असल्याचे दिसून आले.
यावेळी त्याच्या दवाखान्यातील सर्व औषधे, त्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, कागदपत्रे डॉ. पवन मालुसरे यांनी जप्त करून त्याला तिवसा पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले. वैद्यकीय अधिकारी पवन मालुसरे यांनी तिवसा पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. यानंतर बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे तिवसासह जिल्हाभरात वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.