अमरावती -शहरात 23 नोव्हेंबर 2017 रोजी घडलेल्या बहुचर्चित प्रतिक्षा म्हेत्रे हत्याकांडात आज जिल्हा व सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे. या हत्याकांडातील आरोपी राहुल बबन भड यास आजन्म कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.
..असे आहे प्रकरण
तीन वर्षापूर्वी 23 नोव्हेंबर 2017 रोजी प्रतिक्षा म्हेत्रे ( वय 24) दुपारी 12.30 वाजे दरम्यान मैत्रिणीसोबत दुचाकीने साईनगर परिसरातील ओंकार मंदिरात गेली होती. मंदिरात देवाचे दर्शन घेऊन मैत्रिणीसोबत दुचाकीने परत निघाली असताना वृदांवन वसाहत परिसरात राहुल भड (वय 24) हा त्यांच्या दुचाकी समोर आला. राहुलने दुचाकी अडविल्याने प्रतिक्षाने गाडी थांबवली. राहुल आणि प्रतिक्षा एकमेकांशी बोलत असताना तिची मैत्रिण बाजूला उभी होती. दरम्यान, राहुलने त्याच्या पाठीवर लटकविलेली बॅग कडून त्यातून चाकू काढला आणि प्रतिक्षावर वार केलेत आणि घटनास्थळावरून पळ काढला.
हेही वाचा -पीओपी मूर्तींवर बंदी नको; मूर्तिकारांनी काढला मोर्चा
दरम्यान प्रतिक्षाच्या मैत्रिणीने आरडाओरड केली. रस्त्याने जाणारा एक दुचाकीस्वार मदतीसाठी थांबला. प्रतिक्षाच्या मैत्रिणीने मंदिरातील एका व्यक्तीलाही बोलावून आणले. एक कारचालकही मदतीला थांबला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रतिक्षाला कारमध्ये बसवून जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.