अमरावती - जुनी पेन्शन योजना संघटनेने लिंगाडे यांना समर्थन दिले आहे. त्याविषयी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, हा सगळा मूर्खांचा बाजार आहे. ज्या पक्षाने जुनी पेन्शन योजना रद्द केली त्याच पक्षाच्या उमेदवाराला मी पाठिंबा देत आहे. याला काय म्हणावे असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला. पदवीधर मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ओंकार अमलकर यांच्या प्रचारनिमित्त अमरावतीत आले असता प्रसार माध्यमांशी बोलत होते.
आमच्या उमेदवाराला निवडून द्यावे - धन, घराणेशाही नको असेल तर आमच्या उमेदवाराला निवडून द्यावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले. ज्याप्रकारे शहरी भागात पदवीधर मतदार संघ आहे त्याच प्रकारे ग्रामीण भागात सुद्धा पदवीधर मतदारसंघ आहे. ग्रामीण भागात आमची यंत्रणा स्ट्रॉंग असल्यामुळे त्यांच्यापर्यंत सहजासहजी शक्य होते. यापूर्वी पदवीधर मतदारसंघासाठी आम्ही निवडणूक लढवली नाही. परंतु जे कोणी शिक्षक मतदार संघात उभे राहत होते त्यांना आम्ही पाठिंबा दर्शवत होतो. परंतु एकत्रितपणे राजकारणामध्ये जो काही घोळ चाललेला आहे तोच घोळ पदवीधर मतदारसंघातही दिसत आहे.
नवीन शैक्षणिक धोरण लादले जातेय - राजकारणामध्ये नीतिमत्ता केव्हा येईल, हे सांगता येत नाही. परंतु या गोंधळाला कुठेतरी अंत दिला पाहिजे. त्या दृष्टीने कोकण विभाग सोडून चारही मतदारसंघांमध्ये आम्ही निवडणूक लढवत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. केंद्र सरकारचे नवीन शैक्षणिक धोरण हे राज्य सरकारवर सरळ सरळ लादत आहे. राज्य सरकारची कुठलीही तयारी नसताना केंद्र सरकार हे धोरण राज्य सरकारवर लादत आहे, असा आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला. नवीन शैक्षणिक धोरण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि स्किल डेव्हलपमेंट या महत्त्वाच्या गोष्टी आहे असे मी समजतो असे ते म्हणाले.