अमरावती :अचलपूरचे आमदार बच्चू कडू, बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यात राजकीय टोकाचा वाद आहे. आमदार रवी राणा यांच्या पत्नी या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असून अमरावती लोकसभा मतदार संघ हा प्रहार जनशक्ती पक्षाला मिळावा यासाठी बच्चू कडू यांनी भाजप, शिवसेना शिंदे गटाकडे प्रस्ताव मांडला आहे. बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा केल्यामुळे विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. खासदार नवणीत राणा, आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात अमरावती मतदारसंघात उमेदवार असतील का? तसेच अमरावतीत राजकारणाची आणखी काही नवी सूत्रे समोर येतील का? याबाबत आता चर्चा रंगायला लागली आहे.
मंत्रिमंडळातील स्थान मिळण्यावरुन वाद :आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू या दोघांचाही शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा आहे. शिंदे सरकारमध्ये दोघांनीही मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल यासाठी दावा केला होता. यातून दोघांमध्ये प्रचंड वाद निर्माण झाला होता. आता बच्चू कडू यांना राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या दिव्यांग कल्याण विभागाच्या दिव्यांगाच्या दारी या उपक्रमासाठी गठीत समितीच्या अध्यक्षपदी निवडण्यात आले आहे. कडूंना मंत्रिपदाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. बच्चू कडू यांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांना दिव्यांग कल्याण विभागाच्या अध्यक्षपदावर आता समाधान मानावे लागले आहे, असे असताना आमदार बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा केल्यामुळे आता भाजप बच्चू कडू यांच्या दाव्याला किती प्रतिसाद देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवनीत राणा अपक्ष उमेदवार :अमरावती लोकसभा मतदार संघात 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत नवनीत राणा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आल्या होत्या. निवडून आल्याबरोबरच त्यांनी केंद्रात सत्तेत आलेल्या भाजप सरकारला पाठिंबा जाहीर केला होता. खासदार नवनीत राणा यांच्या या भूमिकेमुळे अमरावती जिल्ह्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यावर प्रचंड नाराज आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात खासदार नवनीत राणा यांनी सतत आंदोलन केल्यामुळे शिवसैनिकांचा नवनीत राणा यांच्यावर प्रचंड रोष आहे. आमदार बच्चू कडू, राणा यांच्यात प्रचंड वितृष्ट असून आता लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती मतदारसंघावर बच्चू कडू यांनी दावा केल्यामुळे अमरावतीचे राजकारण आणखी तापणार असे चिन्ह आहेत.
विधानसभेच्या 15 ते 20 जागांसाठी आग्रह : आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला महाराष्ट्रात विधानसभेच्या 15 ते 20 जागा लढवायच्या असून त्यासाठी ते आग्रही आहेत. अमरावती जिल्ह्यात अचलपूर, मेळघाट अकोला जिल्ह्यात दोन वाशिम जिल्ह्यात एक नागपूर जिल्ह्यात एक तसेच नाशिक सोलापूर जिल्ह्यात देखील बच्चू कडू आपल्या पक्षाचे उमेदवार उभे करण्याच्या तयारीत असून त्यांनी राज्यात एकूण 15 ते 20 जागांसाठी आग्रह धरला आहे.