प्रज्ञा प्रबोधिनी शिक्षणाची वाट अमरावती : पारधी समाज हा लढवय्या आणि उत्तम कलाकार असणारा समाज. पण त्यांची धर्मावर प्रखर श्रद्धा आहे. या समाजातील मागासले पण आणि समाजाचा गौरवशाली इतिहास लक्षात घेता अमरावती शहरात 14 एप्रिल 2003 ला प्रज्ञा प्रबोधिनी या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यातील पारधी समाजाच्या उत्थानासाठी सेवा कार्यास सुरुवात झाली. 14 एप्रिल 2003 ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत प्रज्ञा प्रबोधिनीची स्थापना झाली. त्यानंतर संस्थेने अमरावती जिल्ह्यातील 40 वस्त्यांचे सर्वेक्षण केले. यापैकी 35 वस्त्यांमध्ये संस्थेचा प्रत्यक्ष संपर्क आहे.
वीस वर्षांपासून प्रज्ञा प्रबोधिनीचे कार्य : वीस वस्त्यांमध्ये पारधी समाजाच्या विकासाच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. बचत गटाच्या माध्यमातून पारधी बांधवांना संघटित करून तसेच त्यांना विविध रोजगारासाठी मार्गदर्शन तसेच कर्ज उपलब्ध करून देण्यास मदत केली गेली. यानंतर त्यांचा प्रज्ञा प्रबोधिनीवर विश्वास वाढत गेला. यामुळे या समाजातील चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे देणे आम्हाला सोयीचे झाले अशी माहिती प्रबोधिनीचे अध्यक्ष अविनाश देशपांडे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
विवेकानंद छात्रावासात घडवत आहेत अनेक विद्यार्थी :अक्षरशः रस्त्यावर फिरणारे तसेच उड्डाणपुलाखाली जगणाऱ्या कुटुंबातील चिमुकल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रज्ञा प्रबोधिनीच्यावतीने विवेकानंद छात्रावास सुरू करण्यात आले. सुरुवातीच्या काळात या समाजातील मुलांना छात्रावासात आणणे त्यांना शिक्षण देणे हे काम अतिशय कठीण होते. मात्र आमच्या प्रयत्नात सातत्य राहिले आणि आम्ही ठाम निश्चय केल्यामुळे या समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात यशस्वी ठरलो. सुरुवातीला आमचे विवेकानंद छात्रावास हे भाड्याच्या घरात होते. त्यावेळी एकूण दहा विद्यार्थी होते. आज मात्र अमरावती शहरातील दस्तूर नगर परिसरातील राजश्री कॉलनी या भागात आमच्या स्वतःच्या इमारतीमध्ये हे छात्रावास सुरू असल्याचे अविनाश देशपांडे यांनी सांगितले.
25 वस्त्यांमधले तीस चिमुकले राहतात :आज या छात्रावासामध्ये जिल्ह्यातील 25 वेगवेगळ्या वस्त्यांमधले तीस चिमुकले राहतात. या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची अतिशय उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. या छात्रावासामध्ये अतिशय स्वच्छ आणि सुंदर स्वयंपाक गृहात चिमुकल्यांसाठी स्वयंपाक तयार केला जातो. सामूहिक अभ्यासासाठी देखील या ठिकाणी खास दालन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या ठिकाणी अभ्यासासोबतच या चिमुकल्यांना संस्काराचे धडे देखील दिले जातात. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांना बाहेर शिकवणी देखील संस्थेच्या माध्यमातून लावण्यात आली आहे. या छात्रावासातून विद्यार्थी नियमित अमरावती शहरातील विविध शाळेत शिकायला जातात.
छान शिकता आले :आमच्या या छात्रवासामध्ये सर्व सुविधा उपलब्ध असून आमच्या घरी आम्ही असतो तर आमचे लग्न लावून दिले असते. आम्हाला असे छान शिकता आले नसते आम्ही शाळेत देखील गेलो नसतो मात्र प्रज्ञा प्रबोधिनीच्या माध्यमातून आम्हाला आज अक्षर ज्ञान झाले इतर मुलांप्रमाणे छान शिकायला मिळाले चांगले राहायला मिळाले असे या छात्रावासातील चिमुकले 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले. रोज पहाटे सहा वाजता उठल्यावर आंघोळ केल्यावर सर्वांना नाश्ता मिळतो त्यानंतर तासभर सर्व विद्यार्थी अभ्यास करतात. दहा वाजता जेवण झाल्यावर अकरा वाजता शाळेला जातात. सायंकाळी साडेपाच वाजता शाळेतून आल्यावर या छात्रावासात विद्यार्थ्यांना नाश्ता मिळतो आणि त्यानंतर संस्कार शिबिर आणि शालेय अभ्यास विद्यार्थी पूर्ण करतात रात्री आठ वाजता जेवण झाल्यावर दहा वाजेपर्यंत पुन्हा विद्यार्थी अभ्यास करतात आणि दहा वाजता सर्वांनी झोपावे असा नियम या छात्रवासाचा आहे.
मिळवली पदव्युत्तर पदवी : अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात येणाऱ्या हिंगलाजपूर या पारधी बेटावरील प्रशांत पवार हा याला विवेकानंद छात्रावासात आणण्यात आले. या ठिकाणी राहून त्याने दहावी आणि बारावी उत्तीर्ण केल्यावर पदवीचे शिक्षण देखील पूर्ण केले. यानंतर प्रशांत पवार याने समाजकार्य या विषयात पदवी मिळवल्यावर पदव्युत्तर पदवी देखील प्राप्त केली. प्रज्ञा प्रबोधिनी संस्था माझ्या आयुष्यात आली नसती तर मी बेड्यावरच लहानाचा मोठा झालं असतो आणि लहानपणीच माझे लग्न झाले असते आज मला कुठेतरी चांगली नोकरी मिळेल अशी आशा आहे माझी पुढची पिढी चांगले जीवन जगेल याची शाश्वती आहे असे प्रशांत पवार ईटीव्ही भारत शी बोलताना म्हणाला. माझ्यासारखेच माझे समाज बांधव शिकावे मोठे व्हावे आणि आमचा समाजात परिवर्तन घडावे यासाठी प्रज्ञा प्रबोधिनी निश्चितच प्रत्येकाला मदतीचा हात देईल अशी आशा देखील प्रशांत पवार या विद्यार्थ्याने व्यक्त केली.
सहल, कार्यशाळा आणि धमाल : पारधी चिमुकल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणताना सर्वसामान्य घरातील मुलांप्रमाणेच त्यांचे बालपण समृद्ध व्हावे या उद्देशाने संस्थेच्यावतीने दरवर्षी वेगवेगळ्या पर्यटन केंद्रावर सहलीचे आयोजन केले जाते. यासह पर्यावरण पूरक मातीचा गणपती तयार करण्याची कार्यशाळा देखील आयोजित केली जाते. आकाश कंदील कार्यशाळा देखील आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत प्रशिक्षण घेतल्यावर आमच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे आकाश कंदील तयार केल्याचे अविनाश देशपांडे म्हणाले. अक्षर सुधारावे यासाठी अक्षर सुधार उपक्रम तसेच वारली पेंटिंग प्रशिक्षण देखील या चिमुकल्यांसाठी आयोजित केले जाते. बेड्यांवरील मुला-मुलींकरिता संस्कार शिबिर आयोजित करून त्यामध्ये योगासन खेळ वेगवेगळ्या स्पर्धा श्लोक कथाकथन मातीच्या मुर्त्या बनविण्याचे प्रशिक्षण तसेच महिलांना रांगोळी काढण्याचे प्रशिक्षण असे विविध कार्यक्रम नित्यनेमाने आयोजित केले जाते अशी माहिती देखील अविनाश देशपांडे यांनी दिली.
हेही वाचा :Pune University News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षाला सुरुवात; विविध कार्यक्रमांचे आयोजन