अमरावती -जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अमरावती शहर, अचलपूर व अन्य नऊ गावांमध्ये सात दिवसांचा कडक लॉकडाऊन लावला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री आठपासून अमरावती शहर, अचलपूर व अन्य नऊ गावांमध्ये या लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे.
वाहनांची विचारपूस
या लॉकडाऊनदरम्यान लोकांनी नियम तोडू नये, यासाठी अमरावती शहरात तब्बल 42 ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तसेच ही 42 ठिकाणे वगळता अमरावती शहराला जोडणाऱ्या मुख्य काही मार्गांवर पोलिसांनी नाकेबंदी केली आहे. जे लोक अमरावतीमध्ये प्रवेश करतात त्या लोकांची, त्यांच्या वाहनांची विचारपूसही पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे. जर कोणी कामानिमित्त अमरावतीत येत असेल तर त्यांना सोडले जात आहे. परंतु विनाकारण विनामास्क अमरावतीत येत असेल तर त्यांच्यावर पोलीस कारवाईदेखील होत आहे.