अमरावती - मासिक पाळीदरम्यान अनेक विद्यार्थिनींना दर महिन्याला शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. या काळात होणाऱ्या त्रासादरम्यान थोडा आराम मिळावा, या उद्देशाने अमरावती शहरातील मणिबाई गुजराती विद्यालयात 'पिंक रूम'ची आगळीवेगळी संकल्पना राबवण्यात आली. या 'पिंक रूम'मध्ये मासिक पाळीदरम्यान घ्यावयाच्या काळजी संबंधी सूचना, पॅडची व्यवस्था, शरिराला पोषक असणाऱ्या आहारांची माहिती अशी सर्व व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. संपूर्ण देशातील एखाद्या शाळेने राबविलेला हा पहिला उपक्रम असून वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या या महाविद्यालयाच्या पिंक रूमचा आदर्श आता देशभरातील अनेक शाळा महाविद्यालय घेत आहेत.
दर महिन्यात येणारी मासिक पाळी आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासामुळे अनेक विद्यार्थिनींची शाळा चुकते. या तीन दिवसात शाळेत न येणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. विद्यार्थिनींना शाळेत येण्यासोबतच दर महिन्यात येणाऱ्या मासिक पाळीबाबत योग्य अशी माहिती मिळावी. तसेच यासंदर्भात जनजागृती व्हावी, या उद्देशाने अमरावतीच्या मणिबाई गुजराती विद्यालयात 'पिंक रूम' ची निर्मिती करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली देव यांच्या संकल्पनेतून 27 जुलै 2019 मध्ये शाळेचा इमारतीच्या पहिल्या मजल्यावर 'पिंक रूम'ची सुरुवात करण्यात आली.
पूर्णतः गुलाबी रंगाने सजविलेल्या या खोलीमध्ये मासिक पाळी दरम्यान मुलींना आवश्यक असणाऱ्या पॅडची व्यवस्था करण्यात आली आहे विशेष म्हणजे व्हिस्पर कंपनीने या उपक्रमासाठी शाळेला मोफत पॅड उपलब्ध करून दिले आहेत. मासिक पाळीदरम्यान विद्यार्थिनींना त्रास होत असल्यास येथे गुलाबी रंगाची गादी आराम करण्यासाठी ठेवण्यात आली आहे. तसेच या काळात कुठल्या स्वरूपाची काळजी घ्यावी, कुठला आहार शरीरासाठी उपयुक्त आहे आहे याची संपूर्ण माहिती पिंक रूममध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. पिंक रूममध्ये शेरा पुस्तिकाही ठेवण्यात आली आहे. या पिंक रूमचा अनेक विद्यार्थिनींनी वर्षभरात लाभ घेतला असून तशा नोंदी त्यांनी शेरा पुस्तिकेमध्ये नोंदविल्या आहेत.