अमरावती - देशभरात सध्या नवरात्रोत्सवानिमित्त मोठ्या उत्साहाने देवीची आराधना करण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यातही नवरात्री उत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील विविध प्राचीन देवी मंदिरांमध्ये मोठ्या आनंदात आणि उत्साहात हा सण साजरा करण्यात येत आहे. मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई येथील गडावरही पिंगळाई देवीच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करीत आहेत.
शारदीय नवरात्रोत्सवात विहिरीतून प्रगट होत भक्तांना दर्शन देणाऱ्या माता पिंगळाईच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातून भाविक पिंगळाई गडावर गर्दी करतात. या गडावर नवरात्रौत्सवानिमित्त देवीची स्थापना करून अखंड नंदादीप प्रज्वलित करून ९ दिवस आदिमायेची मनोभावे पूजा केली जाते. यासोबतच बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश देत या मंदिरात मुलींना देवी मानून येथे नवकन्येचे पुजनही केले जाते.
हेही वाचा - रुख्मिणीच्या माहेरघरातील कुलस्वामिनी अंबिकादेवीला ११५१ अखंड ज्योतीचा संकल्प
मोर्शी-अमरावती राज्य महामार्गावर अमरावतीपासून ३५ किमी. अंतरावर असलेले गोराळा हे गाव आहे. तेथून दीड किमी. अंतरावर असलेल्या निसर्गरम्य टेकडीवर पिंगळाक्षी देवीचे मंदिर आहे. माहूरच्या रेणुका देवीचे प्रतिरूप असलेली ही देवी स्वयंभू मानली जाते. पिंगळाक्षी देवीचे मंदिर हे प्राचीन हेमाडपंथी शैलीत बांधलेले आहे. अंदाजे ५०० - ६०० वर्षांपूर्वी बांधलेले हे ऐतिहासिक मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते.