अमरावती -देशभर नवरात्रोत्सव थाटात साजरा होत असताना अमरावती जिल्ह्यातील नेर येथील पिंगळा देवी मंदिरात भाविक मोठ्या श्रद्धेने देवीच्या दर्शनाला येत आहेत. पिंगळा देवी ही स्वयंभू शक्तीपीठ म्हणून अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध आहे.
700 वर्ष जुने मंदिर -
अमरावती शहरापासून सुमारे 35 किमी अंतरावर मोर्शी मार्गावर नेर पिंगळा हे गाव वसले आहे. नेर पिंगळा या गावसह बोरळा, सावरखेड आणि नमदरा या चार गावांच्या वेशीवर सुंदर गड या पर्वतावर एका विहिरीतून पिंगळा देवीवर आल्याची आख्यायिका आहे. या विहिरीतून पिंगळादेवी सोबतच कमळा देवी सुद्धा प्रकट झाली असल्याचे मानले जाते. निजामशाहिच्या काळात 700 वर्षापूर्वी निजामने या गडावर ज्या विहिरीतून पिंगळादेवीचा मुखवटा बाहेर आला, त्या ठिकाणी मंदिर बांधले. या मंदिरावर मशिदीवर असतात तसे घुमट बांधण्यात आले. आता मात्र या मंदिराचे नुतनीकरण होत असून मंदिराचा गाभारा आहे, तसाच ठेऊन मंदिर नव्याने उभारले जात आहे.
नवसाला पावणारी देवी -
पिंगळादेवी ही नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक भाविक मंगळवारी आणि शुक्रवारी पिंगळा देवीच्या दर्शनाला येऊन येथे आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी नवस बोलतात. या देवीजवळ नवस पूर्ण होतो, असा विश्वास भाविकांना असून नवस पूर्ण होतात भाविक पुन्हा मंदिरात येतात आणि जो काही नवस बोलला त्याची पूर्तता करतात. पिंगळा देवीचे नामस्मरण केल्याने अडचणीमध्ये असलेल्या भाविकांचे मार्ग सुकर होतात. पिंगळादेवी आपल्या पाठीशी उभी राहत असल्याने आपल्यावरील संकट दूर होते, अशी श्रद्धा भाविकांची आहे.
पिंगळादेवी दिवसातून तीन वेळा बदलते रूप -
पिंगळादेवी ही माहूर येथील रेणुका देवीच्या रूपाप्रमाणेच भासणारी देवी आहे. पिंगळादेवी दिवसातून तीन वेळा रूप बदलते, असे मानले जाते. सकाळच्या वेळी पिंगळा देवी ही बाल्यावस्थेत राहते. तर दुपारच्या वेळी पिंगळादेवी ही तारुण्यावस्थेत असल्याप्रमाणे भासते. रात्री पिंगळा देवीचे स्वरूप हे एखाद्या वृद्धाप्रमाणे जाणवते, असे मंदिरातील पुजारी मुकेश मारुडकर 'ईटीव्ही भारत ' शी बोलताना म्हणाले.
मंदिरालगतच आहे कापूर तलाव -
सुंदर गडावर पिंगळाई देवीच्या मंदिरापासून काही अंतरावरच कापूर तलाव आहे. नवरात्रात अष्टमीच्या दिवशी कापूर तलावावर मोठ्या प्रमाणात कापूर जाळला जातो. हा तलाव सुद्धा सहाशे वर्ष जुना आहे. पिंगळादेवी पहाटे या तलावात आंघोळ करायासाठी जाते, असे भाविक मानतात. अनेकांना पहाटेच्या सुमारास तलाव परिसरात पैजण वाजत असल्याचा आवाज येतो, अशी माहितीही मंदिराचे पुजारी मुकेश मारुडकर यांनी दिली. डोंगरावर असणाऱ्या या तलावात बाराही महिने पाणी साचून राहते, हे या तलावाचे वैशिष्ट्य असून या तलाव परिसरात एक आगळे वेगळे वातावरण येणार्या प्रत्येक व्यक्तीला जाणवते.
कोरोनाचे नियम पाळून सुंदर गडावर नवरात्रोत्सव -
गतवर्षी कोरोना असल्यामुळे सुंदर गडावरील पिंगळा देवी मंदिरात नवरात्रोत्सवाच्या पर्वावर कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला गेला नाही. आता कोरोना आटोक्यात आल्यामुळे राज्य शासनाने राज्यातील सर्व मंदिरे खुले केली असताना पिंगळादेवी मंदिरातही नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. कोरोनाचे नियम पाळून मंदिराच्या विश्वस्तांनी भाविकांना मंदिरात प्रवेश दिला आहे. मंदिर प्रशासन शासनाने घालून दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण काळजी घेत असल्याची माहिती पिंगळादेवी संस्थेचे सचिव आशिष मारुडकर यांनी 'ईटीव्ही भारत ' शी बोलताना दिली.
हेही वाचा -नवरात्रोत्सव 2021 : कोरोनाचे नियम पाळून अंबानगरीत नवरात्रोत्सवाला प्रारंभ