अमरावती -कोरोनामुळे मागील काही महिन्यांपासून रखडलेल्या संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीच्या महाविद्यालयीन परीक्षा या सध्या आता ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. अनेक गावांत नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांना पेपर देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. यातच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. गावात मोबाइलला नेटवर्क मिळत नसल्याने पेपर देणे शक्य होत नाही म्हणुन नजीकच्या गावात पेपर सोडवण्यासाठी पायदळ जात असलेल्या दोन बहिणीवर रानडुक्कराने जीवघेणा हल्ला केला. ही घटना अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील बर्हानपूर या गावात घडली आहे. या पैकी एका बहिणीला गंभीर दुखापत झाल्याने तिच्यावर अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. अश्विनी संजय काळे (वय २१ ) असे गंभीर दुखापत झालेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे.
अश्विनी संजय काळे ही अमरावतीच्या विद्याभारती महाविद्यालयात बीएच्या द्वितीय वर्षाला तर लहान बहीण ज्ञानेश्वरी काळे ही शासकीय तंत्रनिकेतनच्या तृतीय वर्षाला आहे. त्या आपल्या महाविद्यालयाच्या ऑनलाइन प्रात्यक्षिक परीक्षा देत होत्या. पण बर्हानपूर या त्यांच्या छोट्या गावात नेटवर्कची प्रचंड अडचण आहे, त्यामुळे पेपर कसा सोडवायचा हा प्रश्न त्यांच्या समोर होता. त्यामुळे त्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या बेलोरा येथे वाचनालयात पेपर देण्यासाठी पायी निघाल्या होत्या. दरम्यान वाटेतच रानडुकराने हा हल्ला केला. यात अश्विनी ही गंभीर जखमी झाली तर ज्ञानेश्वरी ही किरकोळ जखमी झाली. तिच्यावर बेलोरा येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर अमरावती येथे एका खासगी रुग्णालयात दोघींनाही दाखल करण्यात आले. अश्विनीला गंभीर दुखापत असल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान या मुलींची परिस्थिती अतिशय बेताची असल्याने शासनाने सानुग्रह मदत करण्याची मागणी त्यांनी केली आहे.