अमरावती - वाशिम येथील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यासाठी आलेल्या डॉक्टरांना बडनेरा जुनी वस्ती परिसरातून पिटाळून लावण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी संचारबंदी असतानाही फिरणाऱ्या एका वाहनाला अडविल्यामुळे जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना बडनेरा येथे घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.
बडनेरात पोलिसांवर दगडफेक; डॉक्टरांनाही पिटाळून लावण्याचा धक्कादायक प्रकार
दिल्ली येथील मरकझमधून परतलेल्या वाशिमच्या व्यक्तीला जुनी वस्ती बडनेरा येथील तीन मशिदीत 3 ते 4 दिवस आश्रय देण्यात आला होता. यानंतर संचारबंदी असतानाही काही नेत्यांच्या शिफारशीवरून त्या व्यक्तीस वाशिम जिल्ह्यात पाठविण्यात आले होते.
दिल्ली येथील मरकझमधून परतलेल्या वाशिमच्या व्यक्तीला जुनी वस्ती बडनेरा येथील तीन मशिदीत 3 ते 4 दिवस आश्रय देण्यात आला होता. यानंतर संचारबंदी असतानाही काही नेत्यांच्या शिफारशीवरून त्या व्यक्तीस वाशिम जिल्ह्यात पाठविण्यात आले होते. दरम्यान, ती व्यक्ती कोरोनाग्रस्त असल्याचे समोर आल्यावर जुनी वस्ती बडनेरा येथील काही जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या भागातील रहिवाशांची आरोग्य तपासणी करण्यासाठी रविवारी सकाळी आरोग्य विभागाचे पथक बडनेरा जुनी वस्ती परिसरात गेले असता त्यांना पिटाळून लावण्याचा प्रकार घडला.
या प्रकारामुळे परिसरात तणाव असताना एक चारचाकी मालवाहू वाहन पोलिसांनी अडविले. यावेळी वाहन चालकाने मी आजारी असून, रुग्णालयात चाललो असे पोलिसांना सांगताच पोलिसांनी तो खोटं बोलत असल्याबाबत आक्षेप घेतला. दरम्यान, वाहन चालकाने काही अंतरावर जमलेल्या गर्दीत जाऊन पोलीस त्रास देत असल्याचे सांगितले. यावेळी गर्दीतून पोलिसांवर दगडफेकीला सुरुवात झाली. पोलिसांनी स्वतः चा कसाबसा बचाव करीत या प्रकाराची माहिती वरिष्ठांना दिली. काही वेळातच पोलिसांचा भला मोठा ताफा घटनास्थळी पोहोचला. यानंतर जुनी वस्ती बडनेरा येथील सर्व रस्ते बंद करण्यात आले. दगडफेक करणाऱ्यांची धरपकड करण्यात आली. या घटनेमुळे बडनेरा परिसरात खळबळ उडाली आहे.