अमरावती- मोर्शी तालुक्यातील काटपूर गावात दोन वर्षापासून पाणी फाउंडेशन, सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून गावकरी श्रमदान करतात. पाणी अडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात काटपुरात काम सुरू करण्यात आले आहे. यंदाच्या स्पर्धेसाठी रविवारी महाश्रमदानाचे आयोजन ग्रामस्थांकडून करण्यात आले होते. या महाश्रमदानासाठी आमदार यशोमती ठाकूर गावातील नागरिकांसह परिसरातील स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी श्रमदान करून गावकऱ्यांना हातभार लावला आहे.
महाश्रमदान; काटपूर गाव पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थांनी भर उन्हात गाळला घाम - मोर्शी
पाणी अडवण्यासाठी पाणी फाउंडेशन, सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून काटपुरात काम सुरू करण्यात आले आहे. यंदाच्या स्पर्धेसाठी रविवारी महाश्रमदानाचे आयोजन ग्रामस्थांकडून करण्यात आले होते.
काही वर्षांपासून जिल्ह्यातील अनेक गावांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यामध्ये मोर्शी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याचा दुष्काळ आहे. असाच दुष्काळ सद्या काटपूरवासीयांना पाहायला मिळत आहे. मात्र भविष्यात पाण्याचे विदारक चित्र राहू नये, म्हणून पाणी फाउंडेशन, सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2019 अंतर्गत रविवारी काटपूर शिवारात श्रमदान करण्यात आले. सकाळी साडेसहा वाजता महाश्रमदानास शेकडो गावकऱ्यांनी कुदळ, फावडे घेऊन सुरुवात केली. सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालयातून ढोल ताशांच्या गजरात गावातून दिंडी काढण्यात आली.
या दिंडीमध्ये गावातील आबालवृद्धांसह, महिलांचा समावेश होता. श्रमदान करणाऱ्या प्रत्येकाचे औक्षण करून खोदकामाला सुरुवात करण्यात आली. उपस्थित सर्व श्रमदात्यांनी सीसीटीचे खोदकामास प्रारंभ केला. सकाळी 7 वाजता प्रत्यक्ष श्रमदानाला सुरुवात झाली. रविवारी रखरखत्या उन्हात दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू असलेल्या महाश्रमदानात जवळपास दोन हेक्टरमध्ये काम पूर्ण झाले. या वेळी गावकरी, जलमित्र, शेतकरी, महिला, वनरक्षक, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी यांचा समावेश होता.