अमरावती- बडनेरा मतदार संघात जी कामे मंजूरच झाली नाही अशा कामांचे भूमिपूजन आमदार रवी राणा करीत आहे. शहरातील अनेक प्रभागात जी कामे नगरसेवकांनी खेचून आणली त्या कामांचेही भूमिपूजन करण्याचा सपाटा आमदार रवी राणा यांनी लावला आहे. आमदार राणा यांची लबाडी आता जनतेला कळली असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे डिपॉझिट जप्त होणार, असे भाकीत भाजपचे नगरसेवक तुषार भारतीय यांनी केले आहे.
आमदार रवी राणा यांच्या खोटारडेपणा विरोधात भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि नगरसेवक तुषार भारतीय यांनी आज पत्रकार परिषद घेतली. अमरावती महापालिकेच्या वतीने शहरात अनेक भागात रस्त्यांचे, उद्यानांचे काम होत आहे. ही कामे प्रभागातील नगरसेवकांच्या प्रयत्नाने होत असताना अशा कामांचे भूमिपूजन आमदार रवी राणा हे आपल्या मर्जीने करून त्या कामांचे श्रेय घेत आहे.
बडनेरा मतदारसंघात येणाऱ्या अंजनगाव बारी या गावात पाच महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम सुरू झाले होते. आज ५० टक्क्यांच्यावर काम पूर्ण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांनी या कामाचे भूमिपूजन सोहळा आयोजित केला होता. मात्र ग्रामस्थांनी त्यांना हा काय मूर्खपणा आहे? असा सवाल करीत त्यांना गावातून पिटाळून लावले, असे तुषार भारतीय यांनी सांगितले.