अमरावती -शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या नांदगाव पेठ येथील एका कोरोनामुक्त महिलेच्या कुटुंबावर गावातील लोकांनी अप्रत्यक्षरित्या बहिष्कार टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. दीड महिन्यापूर्वी या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. उपाचारानंतर ही महिला कोरोना मुक्त झाली आहे. मात्र, तरीही तिला आणि तिच्या कुटुंबाला गावकऱ्यांच्या बहिष्कृत वागण्याला सामोरे जावे लागत असल्याने ही महिला त्रस्त झाली आहे.
नांदगांव पेठमधील कोरोनामुक्त महिलेच्या कुटुंबावर नागरिकांचा बहिष्कार
सरकार 'रुग्णांशी नव्हे तर रोगाशी लढा,' अशी जाहिरात करत आहे. मात्र, तरीही नागरिक मागासल्यासारखे वागत आहेत. नांदगाव पेठ येथील एका कोरोनामुक्त महिलेच्या कुटुंबावर गावातील लोकांनी अप्रत्यक्षरित्या बहिष्कार टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. दीड महिन्यापूर्वी या महिलेला कोरोनाची लागण झाली होती.
कोरोनामुक्त झालेली महिला कामानिमित्त गावात गेली की, लोक तिला टोमणे मारतात, कोरोना होऊनही ही जिवंत कशी? म्हणून हेटाळणी करतात, तर काही लोक या महिलेला बघितले की रस्ताच बदलतात. एखाद्या वाहनातून प्रवास करायचे ठरवले तर सह प्रवासी या महिलेला पाहून दुसऱ्या वाहनात बसतात. महिलेला आणि तिच्या कुटुंबीयांना या बहिष्कृत भावनेचा दररोज सामना करावा लागत आहे. या प्रकाराला कंटाळून महिलेने शासनाला आणि प्रशासनाला जाचातून मुक्त करण्याची विनंती केली आहे.
सरकार 'रुग्णांशी नव्हे तर रोगाशी लढा,' अशी जाहिरात करत आहे. मात्र, तरीही नागरिक मागासल्यासारखे वागत आहेत. प्रशासनाने ही बाब गंभीरपणे घेणे आवश्यक झाले आहे. दरम्यान, याबाबत नांदगाव पेठ पोलिसांना देखील माहिती देण्यात आली आहे. कोरोना रुग्णांवर बहिष्कार टाकणे हा गुन्हा असून हा गुन्हा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा, पोलीस निरीक्षक गोरगनाथ गांगुर्डे यांनी दिला.