अमरावती- गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. उपाहारगृह, शौचालयातून निघणारे सांडपाणी थेट रस्त्यावर तुंबले असल्याने याठिकाणी प्रवाशांना घाणीसह दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
बसस्थानक परिसराची दैना; घाणीच्या साम्राज्यात प्रवासी हेही वाचा - थंडीची चाहूल लागताच पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवर 'कलहंस' पक्षांचे आगमन
गेल्या सहा महिन्यांपासून मध्यवर्ती बस स्थानक परिसरात सांडपाणी रस्त्यावरुन वाहत आहे. या परिसरात अमरावतीवरून नागपूरला जाणाऱ्या गाड्या उभ्या राहतात त्या ठिकाणी प्रवाशांना या सांडपाण्यातूनच गाडी पकडण्यासाठी मार्ग काढावा लागत आहे. उपहारगृहातून बाहेर पडणारे पाणी वाहून नेणाऱ्या नालीमध्ये घाण कचरा साचला असून पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. प्रचंड घाण साचली असून या घाणीतून वाहणारे पाणी थेट बस स्थानक परिसरात येत असल्याने येथील वातावरण अतिशय घाणेरडे झाले आहे.
या संपूर्ण प्रकाराबाबत आगार व्यवस्थापकांसह महापालिकेकडे तक्रार केली असून या समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करत असून लवकरच काम सुरू होईल, अशी माहीती उपहारगृहाचे व्यवस्थापक सुधीर गावंडे यांनी दिली. परिसरातील सांडपाण्याची ही समस्या लवकरात लवकर सोडविण्याची मागणी प्रवाशांनीही केली.