अमरावती -शहर आणि जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातला असताना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात एकूण 90 कर्मचारी कोरोनाबाधित असल्याने विद्यापीठाच्या कामाचा सध्या बोऱ्या वाजला आहे. विद्यापीठातील जवळपास सर्वच कामकाज ठप्प असून बहूतेक विभागात शुकशुकाट आहे.
कोरोना चाचणी शिबिरात 63 जण कोरोनाबधित -
विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने विद्यापीठातील एकूण 400 पूर्ण वेळ कर्मचारी आणि 250 अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी 22, 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी कोरोना चाचणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी एकूण 63 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे स्पष्ट झाले. याव्यतिरिक्त खासगी प्रयोगशाळेत चाचणी करणाऱ्या एकूण 27 जणांना कोरोनाची लागण झाली आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेक अधिकारी आणि विभाग प्रमुख सुद्धा कोरोनाग्रस्त असल्याने विद्यपीठात शांतता पसरली आहे.
पदवीदान समारंभ रखडला -
2019-20 या शैक्षणिक सत्रात पदवी, पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवीप्रदान करण्यासाठी आयोजित पदवीदान समारंभ रखडला आहे. 21 फेब्रुवारी रोजी हा सोहळा होणार होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या समारंभासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात येणार होते. मात्र, अमरावतीत कोरोनाने नव्याने तोंडवर काढल्याने विद्यापीठाला हा समारंभ रद्द करावा लागला.
NAAC ची कामेही रखडली -
गतवेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला NAAC चे 'अ' दर्जाचे मानांकन मिळाले होते. यावर्षी NAAC साठीची कामे सुध्दा रखडली असल्याने यावर्षी NAAC चे कसे होणार, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. NAAC चे मांनांकन मिळाले नाही, तर विद्यपीठाला कोट्यवधींच्या निधीपासून वंचित राहावे लागणार आहे.