अमरावती -शहरात एम.एस.आर.टी.सी अंतर्गत बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या खाली मालवीय चौकापासून राजापेठपर्यंत अमरावती महानगरपालिकेने पुन्हा एकदा पे अँड पार्किग सुरू केले आहे. येत्या काही दिवसात या विषयावरून अमरावतीकरांच्या असंतोषाचा सामना पुन्हा एकदा अमरावती महापालिकेला करावा लागणार आहे.
अमरावतीतील पे अँड पार्किंगचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर एम.एस.आर.टी.सी अंतर्गत बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाची संपूर्ण जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. असे असताना अमरावती महापालिकेने 31 डिसेंबर 2016 ते 10 जानेवारी 2017 या कालावधीत उड्डाणपुलाखाली पे अँड पार्किंगसाठी निविदा काढल्या होत्या. आठ लाख रुपयांमध्ये वर्षभरासाठी पेंड पार्किंगचे कंत्राट अमरावती महापालिकेने दिले आहे.
2017मध्ये मालवीय चौक ते राजापेठपर्यंत उड्डानपूलाखाली पे अँड पार्किंग सुरू झाले होते. पे अँड पार्किंग म्हणजे अमरावतीकरांकडून जबरदस्तीने पैसे उकळण्याचा उद्योग असल्याचा आरोप विविध पक्षांकडून करण्यात आला होता. आमदार रवि राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पार्किंगच्या विरोधात तत्कालीन महापालिका आयुक्त हेमंत पवार यांची खुर्ची बाहेर काढून ती चक्क राजकमल चौकातील उड्डाणपुलावर लटकवली होती. त्यानंतर उड्डाणपुलाखालील पे अँड पार्किंग बंद झाले होते.
दीड वर्षानंतर पुन्हा एकदा उड्डाणपुलाखाली पार्किंग सुरू झाले असून चार चाकी वाहनांकडून तीन तासांपर्यंत दहा रुपये आणि बारा तासापर्यंत चाळीस रुपये वसूल करण्यात येत आहेत. दुचाकी स्वारांकडून तीन तासाचे पाच रुपये आणि बारा तासांचे वीस रुपये वसूल करण्यात येत आहेत. राजकमल चौकात एखाद्या व्यक्तीला मेडिकल मधून पाच दहा रुपयांचे औषध घ्यायचे असले तर त्याला आपली दुचाकी उभी करण्यासाठी पाच रुपये आकारण्यात येतात. या प्रकाराचा पुन्हा एकदा सर्वपक्षीय विरोध उफाळून येण्याची शक्यता आहे.
उड्डाणपुलाखालील पे अँड पार्किंग संदर्भात 28 मे 2018 रोजी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना दिलेल्या पत्रात उड्डाणपुलाखाली पार्किंगची निविदा काढण्याचे अधिकार महापालिकेला नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले होते. उड्डाणपुलाची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून महापालिकेकडून सुरू करण्यात आलेली पे अँड पार्किंग बेकायदेशीर असल्याची तक्रारही विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली होती. विभागीय आयुक्तांनी यासंदर्भात अमरावती महापालिकेला तीन वेळा पत्र पाठवून स्पष्टीकरण मागितले. मात्र, महापालिकेने यासंदर्भात अद्यापही कुठलेली स्पष्टीकरण दिले नसल्याची माहिती आहे. येत्या काही दिवसात पुन्हा एकदा पे अँड पार्क विरोधात सर्वपक्षीय आंदोलन छेडले जाणार आहे.