अमरावती - तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी या गावातील शंकर नामदेव राघोर्ते या ४८ वर्षीय रुग्णाचा सोमवारी अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शंकर यांचा मृत्यू शिरजगाव येथील एका खाजगी डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे झाल्याचा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी मृतदेह स्मशानभूमीत ठेवला आणि त्या डॉक्टर विरोधात तिवसा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
शिरजगाव मोझरी येथील रहिवासी शंकर नामदेव राघोर्ते यांना १८ तारखेला सर्दी व ताप आला. तेव्हा त्यांनी गावातील एस. के. बिश्वास या खाजगी डॉक्टरकडे उपचार घेतले. दरम्यान सोमवारी जास्त त्रास झाल्याने त्यांना अमरावतीच्या पंजाबराव रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी या रुग्णावर प्राथमिक उपचार करणारे डॉक्टर एस. के. बिश्वास हे सुद्धा सोबत होते. डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी करताच रुग्णाला तात्काळ नागपूर येथे हलविण्यात सांगितले. पण काही वेळातच शंकर यांचा मृत्यू झाला.