अमरावती - एसटी कर्मचार्यांच्या संपामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक मार्गावरील बसचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे प्रवाशांना तासनतास बस स्थानकावरच तात्काळ राहावे लागत आहे. दिवाळी असल्याने प्रवासाला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.
अमरावती मध्यवर्ती बस स्थानकासह अमरावती शहरात राजापेठ आणि बडनेरा अशी तीन बस स्थानके आहेत. यापैकी बडनेरा येथील अमरावती बस स्थानक क्रमांक दोन येथील कर्मचाऱ्यांनी आज पासून संप पुकारला आहे. हे बस स्थानक भाऊबीजेच्या दिवशी बंद झाले आहे. रेल्वेगाडीने मुंबई, पुणे येथून बडनेराला येणाऱ्या अनेक प्रवाशांना बडनेरा बस स्थानकावरून यवतमाळकडे जाणाऱ्या गाड्या उपलब्ध नसल्यामुळे प्रवासी अडचणीत सापडले आहेत. राजापेठ बसस्थानकावरून यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, पुण्यासाठी गाड्या सुटतात. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. या बस स्थानकावर तासाभरातून एखादी गाडी येत असल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गर्दी बसस्थानकावर पाहायला मिळत आहे.
हेही वाचा-आता एसटी कर्मचाऱ्यांची मंत्रालयावर धडक, मंत्रालयासमोर करणार आंदोलन - गोपीचंद पडळकर
गाड्यांची अवस्था ही खराब
राजापेठ बस स्थानकावर दुपारी बारा वाजता येणारी नागपूर-अमरावती व नागपूर बुलढाणा ही गाडी आज दीड वाजता पोहोचली. दीड तास उशिराने आलेल्या या गाडीत बसण्यासाठी खामगाव आणि बुलढाण्याच्या प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली होती. प्रवाशांनी गाडीत कशीबशी जागा मिळाल्यावर चालक आणि वाहक यांनी टायर पंक्चर असल्याचे सांगून प्रवाशांना खाली उतरून दिले. यानंतर ही गाडी दुरुस्त करण्यासाठी अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात नेण्यात आली. शुक्रवारीसुद्धा बुलढाणाकडे जाणाऱ्या गाड्या सकाळी बंद होत्या. तीन वाजण्याच्या सुमारास चांदुर रेल्वे बुलढाणा ही गाडी राजापेठ बस स्थानकावर आली. प्रवाशांनी खच्चून भरून निघालेली ही गाडी अर्ध्या रस्त्यातच बंद पडली. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाल्याची माहिती प्रवाशांच्या नातेवाईकांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
हेही वाचा-एसटी कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या दिवशी संप सुरूच; राज्यातील 55 एसटी डेपो बंद!