अमरावती -कोरोनामुळे पाच महिने शांत असणाऱ्या बडनेरा रेल्वेस्थानकावरून आता दोन दिवसाआड रेल्वेगाड्या धावू लागल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करूनच प्रवाशांना आपले तिकीट आरक्षित करून गाडीत प्रवेश मिळत आहे. मात्र, जनरल बोगी सध्या तरी बंदी ठेवण्यात आल्या आहेत.
बडनेरा रेल्वे स्थानकावरून प्रवासी वाहतूक सुरू कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर होताच 24 मार्चपासून देशभरातील रेल्वेसेवा ठप्प झाली. अद्यापही कोरोनाचा प्रकोप कायम असला तरी, कोरोनाशी लढा देत आणि सर्व सुरक्षितता बाळगत देशातील सर्वच बाजारपेठा आणि आस्थापना सुरू होत आहेत. 13 सप्टेंबरपासून काही प्रवासी रेल्वेगाड्या पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. अमरावती रेल्वेस्थाकवरून एकही गाडी सुरू झाली नसली तरी, अमरावतीलागतच्या बडनेरा रेल्वेस्थानकावरून ठराविक गाड्या सुरू झाल्या आहेत. ओदिशातून येणारी व गुजरातमधील अहमदाबादला जाणारी लॉकडाऊननंतरची पहिली रेल्वेगाडी 13 सप्टेंबरला बडनेरा रेल्वेस्थानकावर थांबली. ही गाडी बडनेरा रेल्वेस्थानकावरून प्रत्येक रविवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी धावणार आहे. अहमदाबाद येथून पुन्हा ओदिशाला जाताना हीच गाडी बडनेरा स्थानकावर रविवार, सोमवार, मंगळवार, शुक्रवारी सकाळी थांबणार आहे. याव्यतिरिक्त गांधीधाम ते पुरी ही गाडी दर गुरुवारी सायंकाळी सुटणार आहे तर, पुरी ते गांधीधाम ही गाडी प्रत्येक रविवारी सकाळी बडनेरा रेल्वेस्थानकावर येईल.
भुवनेश्वर ते अहमदाबाद ही गाडी प्रत्येक गुरुवारी सायंकाळी 5.30ला स्थानकात येईल तर, शनिवारी ही गाडी सकाळी 8.50ा परत जाताना बडनेराला थांबणार आहे. खुर्दा रोड ते ओखा जाणारी गाडी प्रत्येक सोमवारी दुपारी 1.07 वाजता येईल. ही गाडी परत जाताना प्रत्येक गुरुवारी सकाळी 7.57ला येणार आहे. हावडा-अहमदाबाद ही गाडी प्रत्येक बुधवार, शनिवार आणि सोमवारी रात्री 10.05 वाजता बडनेराला येईल तर, परत जाताना ही गाडी प्रत्येक शुक्रवार, सोमवार आणि बुधवारी दुपारी 2.40ला येणार आहे. हावडा मुंबई ही गाडी मंगळवार, गुरुवार आणि रविवारी सायंकाळी 5.10ला येऊन 3 मिनिटांत सुटणार आहे. तसेच, हावडा-मुंबई ही गाडी 22 सप्टेंबरपासून प्रत्येक मंगळवार, गुरुवार आणि रविवारी सायंकाळी 5.10ला येऊन 5.13ला सुटणार आहे. सध्या फक्त सहा गाड्यांच्या अप आणि डाऊन अशा 12 फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. येणाऱ्या काळात परिस्थिती पाहून गाड्यांची संख्या वाढवली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
प्रवाशांना करावे लागणार या सूचनांचे पालन -
- गाडी सुटण्याच्या दीड तास अगोदर रेल्वेस्थानकावर येणे बंधनकारक
- आरक्षित तिकीट असणाऱ्यांनाच मिळेल रेल्वे स्थानकावर प्रवेश
- थर्मल स्क्रिनिंगशिवाय रेल्वे स्थानकावर प्रवेश नाही
- प्लॅटफॉर्म तिकीट कुणालाही मिळणार नाही
- अटी मोडणाऱ्या व्यक्तींवर होणार पोलीस कारवाई