अमरावती - विदर्भातचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव गाईचे मंदिर असणारे गावं म्हणजे अमरावती जिल्ह्यातील सार्शी (Sarshi Village Amravati) (गाईची). येथील महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या पार्वती माता (Parvati Mata Cow) गाईची वंशज असलेल्या गाईचा आज आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून, गावात या गाईची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्यसंस्कारालाही हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. गाईच्या मृत्यूने गाव हळहळले असून, अनेकांना अश्रू अनावर झाले होते.
सार्शी या गावाला 17 व्या शतकापासून पार्वती माता या गाईची एक ऐतिहासिक पार्श्वभूमी प्राप्त झाली आहे. सारसी गावामध्ये 17 व्या शतकात डायरिया नावाच्या आजाराने धुमाकूळ घातला होता. पण पार्वती माता गाईच्या दुधामुळे सार्शी गावातील लोकांचे प्राण वाचले असे येथील नागरिक सांगतात. तेव्हापासून या गावात दरवर्षी पौष पौर्णिमेला गौमातेचा खूप मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो. सात दिवस हरिनाम सप्ताह, शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. सकाळी याच पार्वती मातेच्या वंशज असलेल्या गाईला देवाज्ञा झाली. या गाईमुळे गावाला विदर्भातचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळाली आहे. या गाईची अंत्ययात्रा काढून अंत्यसंस्कार करण्यात आले.
- गाईचे मंदिर असलेले सार्शी गाव -
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील सार्शी या गावात अनेक वर्षापासून गाईला पुजण्याची परंपरा लाभली आहे, पार्वती माता संस्थान सार्शी या ठिकाणी गावाच्या अगदी मध्यभागी गाईचे मंदिर असून, येथे जिल्ह्यातून अनेकजण दर्शनासाठी येत असतात. येथील ग्रामस्थ या मंदिराविषयी अनेक गोष्टी सांगतात. एकाच गाईपासून तिचे वंशज आजपर्यंत गावात फिरत असून, त्यांची पूजा तसेच व्यवस्था ग्रामस्थांकडून केली जाते. सार्शी गावातील पार्वती देवस्थानच्या सध्या दोन गायी आहेत. या गाईंना विश्रांतीला बाहेर गावातील लोक स्वेच्छेने बसायला गाद्या, खायला ढेप आणून देतात. या गावातील गाईंची एवढी सोय करण्यामागे मोठा इतिहास असल्याचे येथील गावकरी सांगतात.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील सार्शी या गावाला गाईंची सार्शी म्हणून ओळखले जाते. 17 व्या शतकाच्या दरम्यान या गावामध्ये एक गाय आली होती. ती देवरुपी गाय येथील एका वडाच्या झाडाखाली थांबली होती. पुढे, तिथेच वास्तव्य करणाऱ्या या गाईचा वंश वाढत गेला असल्याचा दावा येथील गावकरी करत आहेत. तेव्हापासून या गावात गाईंची पूजा केली जात असल्याचेही गावकऱ्यांकडून सांगितले जाते.
- गाईंना बसायला टाकतात कापसाच्या गाद्या -
पुढे एका गाईपासून झालेल्या वंशजाची वाढ आज दहा गाईपर्यंत येऊन पोहोचली आहे. तर यातील सहा गाईंचा मृत्यू झाला आहे. त्या गाईंच्या मंदिराला लागूनच समाधी बांधण्यात आली आहे. तर इतर चार गाई या गावात वास्तव्याला आहेत, या गायीवर गावकऱ्यांची अपार श्रद्धा आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामस्थ या गाईंची विशेष काळजी घेतो. तर आस्थेने दर्शनाला आलेले भाविक या गायींसाठी गादीचे आसन दान करतात. या ठिकाणी मोकाट जनावरांना कत्तलीसाठी नेण्यास बंदी आहे. त्यासाठी गोशाळाही आहेत. या ठिकाणी देखील लोक स्वतःहून गाईंना चारा, बसण्यासाठी कापसाच्या गाद्या आणून देत असल्याचीही माहिती येथील गावकऱ्यांनी दिली.
- थेट स्वयंपाक गृहात गाईंचा मुक्त संचार -
आपल्याकडे एखादी गाय आली तर आपण तिला पोळी टाकून मोकळे होतो. परंतु या गावातील गाई अनेक घरी जाऊन थेट घराचा हॉल किंवा स्वयंपाक खोलीत प्रवेश करतात व तिथच विश्रांती घेतात. या गावातील महिला देखील त्यांचा सन्मान करतात. त्यांना पोळीचा नैवद्य दाखवतात. एवढेच नाहीतर घराच्या अंगणात गाईंसाठी चटई टाकली जाते. मग त्या गायी चटईवर दिवसभर आराम करत असल्याचेही गावकऱ्यांनी सांगितले.
- गावात भागवत सप्ताहाचे आयोजन -
पौष महिन्यात सात दिवस या गावात भागवत सप्ताहाचे आयोजन केले जाते. तिथे सामाजिक कार्यक्रम होत असल्याचे तरुण सांगतात. गावात गाईच्या पुण्यतिथी सप्ताहनिमित्ताने काल्याचा कार्यक्रम केला जातो, लोकांकरिता महाप्रसाद असतो. जेव्हा ही गाय सर्व महाप्रसाद उष्टा करते तेव्हा कुठे त्याचे वाटप लोकांमध्ये केले जाते, असे येथील ज्ञानेश्वर डोमाआप्पा मंजु सांगतात. या सर्व धार्मिक कार्यक्रमामुळे आता या गावाचा नावलौकीक संपूर्ण राज्यभर पसरत आहे.