अमरावती -राज्यात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत असल्याने कोरोना रुग्णांचा जीव जात आहे. नाशिकमध्ये ऑक्सिजन लिकेजमुळे 24 रुग्णांचा नाहक बळी गेल्याची घटना समोर आली आहे. असे असताना मात्र अमरावतीच्या सुपर स्पेशालीटी कोविड रुग्णालयात तबल 72 लाख रुपये खर्च करून उभारलेला 21 टन क्षमता असलेला ऑक्सिजन टँक मात्र येथील रुग्णांसाठी नवसंजीवनी देणारा ठरतो आहे. त्यामुळे ऑक्सिजन अभावी जीव सोडण्याची वेळ येथील रुग्णांवर येत नाही, ही बाब दिलासादायक ठरत आहे.
काही दिवसांपूर्वीच उभारण्यात आले होते ऑक्सिजन टॅंक -
राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. त्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे रुग्णालयात बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची कमतरता जाणवू लागली आहे. अमरावती जिल्ह्यातही ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी काही दिवसांपूर्वीच सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या मागच्या बाजूला हे मोठे ऑक्सिजन टॅंक उभारण्यात आले होते. त्यामुळे येथील रुग्णांना सध्या तरी सुरळीत ऑक्सिजन मिळत आहे.
प्रत्येक शहराची मागणी वाढली -
एकदा यामध्ये ऑक्सिजन रिफील केल्यानंतर जवळपास तीन दिवस चालत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. या सिलेंडरसाठी लागणारा प्राणवायू हा चाकण आणि भिलाई येथून मागवला जातो. सध्या देशभर ऑक्सिजनच्या तुटवडा आहे. प्रत्येक शहराची मागणी वाढली आहे. त्यामुळे प्राणवायू मिळविण्यासाठी प्रत्येक पुरवठादाराला दररोज संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष सध्या टोकाला पोहोचला असून मागणीनुसार पुरवठा केला जात नसल्याचेही ती समोर आले आहे.