अमरावती -सरकारच्या पणन महासंघाकडे नोंदणी केलेल्या पश्चिम विदर्भातील सव्वा लाख शेतकऱ्यांपैकी २६ मे रोजीपर्यंत केवळ पस्तीस हजार शेतकऱ्यांचाच कापूस खरेदी केला गेला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अद्यापही ८६ हजार शेतकऱ्यांच्या घरात लाखो क्विंटल 'पांढरं सोनं' खरेदी विना पडून आहे. हा आकडा फक्त नोंदणीकृत शेतकऱ्यांचाच आहे. परंतु यापेक्षा जास्त आकडा हा अनेक अडचणीमुळे कापूस खरेदीसाठी नोंदणी करू न शकलेल्या शेतकऱ्यांचा आहे. अशात खरिपाचा हंगाम तोंडावर आहे. या हंगामासाठीच्या पेरणीसाठी बी-बियाणे, खते खरेदी करायला पैसे कुठून आणावे? हा जटील प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. अनेक शेतकरी आपला कापूस कमी किंमतीमध्ये खासगी व्यापाऱ्याला विकताना दिसून येत आहेत.
कोरोनामुळे दोन महिने बंद असलेली राज्यातील शासकीय कापूस खरेदी प्रक्रिया ही एप्रिल महिन्याच्या २१ तारखे पासून सुरू झाली होती. २१ एप्रिलपासून शेतकऱ्यांनी कापूस नोंदणी सुरू केली होती. त्यानंतर काही दिवसात प्रत्यक्षात कापूस खरेदीला सुरुवात झाली होती. पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा या पाच जिल्ह्यातील जवळपास सव्वा लाख कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपली नोंदणी ही शासनाच्या पणन महासंघाकडे केली होती. दरम्यान कापूस खरेदी प्रक्रियेला एक महिना पूर्ण होत असताना या एक महिन्यात २६ मे रोजीपर्यंत केवळ पस्तीस हजार शेतकऱ्यांचाच कापूस खरेदी केल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भातील नोंदणीकृत ८६ हजार शेतकऱ्यांच्या घरी तर नोंदणी न करू शकलेल्या लाखो शेतकऱ्यांच्या घरी अजूनही कापूस तसाच पडून आहे. पश्चिम विदर्भातील सर्वाधिक कापूस नोंदणी ही अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. तर सर्वात कमी कापूस नोंदणी ही बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
अमरावती जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या २९ हजार ५५७ शेतकऱ्यांपैकी ७ हजार ३५५ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आला आहे. तर २२ हजार २०२ शेतकऱ्यांचा कापूस खरेदीच्या प्रतीक्षेत आहे. अकोला जिल्ह्यातील २५ हजार ९४३ पैकी ६ हजार ९२६ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आला आहे. तर १९ हजार १७ शेतकऱ्यांचा कापूस घरी पडून आहे. वाशीम जिल्ह्यातील ४ हजार ५७८ शेतकऱ्यांपैकी १ हजार २२६ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी झाला आहे, तर ३ हजार २५२ शेतकऱ्यांचा कापूस खरेदीविना घरी पडून आहे.
कापसासाठी प्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात ३० हजार ८७६ शेतकऱ्यांपैकी १५ हजार ४२३ शेतकऱ्यांचाच कापूस खरेदी होऊ शकला असल्याने १५ हजार ४५३ शेतकऱ्यांचा कापूस घरीच पडून आहे. तर बुलडाणा जिल्ह्यातील २९ हजार ६६७ शेतकऱ्यांपैकी केवळ ३ हजार ३११ शेतकऱ्यांचा कापूस हा खरेदी झाला आहे आणि त्यामुळे २६ हजार ३५६ शेतकऱ्यांचा कापूस अद्यापही खरेदीच्या प्रतीक्षेत आहे.