मेळघाटातील गणेश संग्रहालयात विविध गणेशमूर्तींचे दर्शन अमरावती :सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मेळघाटच्या जंगलात शंभर दोनशे नव्हे तर चक्क सहा हजाराच्या वर गणपती बाप्पांच्या विविध रूपातील, स्वरूपातील आणि आकारातील रूपांचे गणपती विश्व हे अकोला येथील प्रदीप नंद आणि दीपाली नंद या दांपत्याने साकारले आहे. प्रदीप नंद हे वडिलोपार्जित शेती व्यवसायासोबतच मालमत्ता खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. आपल्या ह्या व्यवसायासोबतच त्यांनी अगदी लहानपणापासूनच गणरायाच्या विविध मूर्ती जमा करण्याचा छंद जोपासला. लग्नानंतर प्रदीप नंद यांच्या या छंदाला पत्नी दीपाली नंद यांची देखील साथ मिळाली.
घेतला संग्रहालय साकारण्याचा निर्णय :संपूर्ण भारतासह परदेशात जेथे कुठे वेगळ्या स्वरूपाचे गणपती मिळतील ते या दांपत्याने सातत्याने जमा केले. दीड-दोन हजाराच्या वर गणपतीच्या विविध मूर्ती जमा झाल्यावर या दांपत्याने गणपतीचे संग्रहालय साकारण्याचा निर्णय घेतला. यासाठी घनदाट जंगल परिसरात, निसर्गाच्या कुशीत अडीच एकरच्या जागेवर अतिशय सुंदर असे गणपती संग्रहालय 2020-21 मध्ये साकारण्यात आले. सुरुवातीला या संग्रहालयात अडीच हजार गणपतीच्या मूर्ती होत्या. आज या सुंदर अशा गणपती मूर्तींची संख्या सहा हजारावर पोहोचली आहे.
गणरायाच्या दर्शनाने भाविक पर्यटक थक्क :खरंतर विदर्भाचे नंदनवन असणाऱ्या चिखलदरा येथे निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना चिखलदरा परिसरातच असणारे गणपती संग्रहालय पाहून सुंदर असा आश्चर्याचा धक्काच बसतो. दक्षिण भारतातील मंदिरांना असते तसेच भव्य आणि आकर्षक प्रवेशद्वार या संग्रहालयाचे आहे. पर्यटकांना नाममात्र शुल्क आकारून हे संग्रहालय पाहता येते. या ठिकाणी संग्रहालयाच्या आत छायाचित्र किंवा चित्रीकरण करण्यास अजिबात परवानगी नाही. मात्र या संग्रहालयातील गणपतीचे विश्व पाहताना प्रत्येक जण हा थक्क झाल्याशिवाय राहत नाही.
असे आहे वैशिष्ट्य :आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने प्रदीप नंद आणि दीपाली नंद हे दाम्पत्य भारतभर फिरत असताना काश्मीरपासून ते कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरातच्या किनाऱ्यापासून ते आसाम, वाराणसी, ओडिशा, कर्नाटक, केरळ येथे असणाऱ्या विविध शैलीतील गणपतींच्या मूर्ती त्यांनी खरेदी केल्या आणि या संग्रहालयात अतिशय सुसज्जपणे मांडल्या. या संग्रहालयात भारताच्या विविध भागासह चीन, इंडोनेशिया, नेपाळ, भूतान, थायलंडसारख्या देशामध्ये असणाऱ्या विविध स्वरूपातील गणपतीच्या मूर्ती देखील आणण्यात आल्या आहेत. काच, माती दगड, लाकूड धातू फायबर अशा विविध माध्यमात बनविलेल्या गणेश मूर्ती या संग्रहालयात पाहायला मिळतात. गणपतीची नाणी देखील या संग्रहालयात आहेत. अगदी बाल गणेशापासून भव्य दिव्य स्वरूपातील गणपतीचे दर्शन या संग्रहालयात घडते. क्रिकेट हॉकी फुटबॉल खेळणारे गणपती, विविध वाद्य वाजवतानाचे गणपती, 26 हजार पेन्सिल पासून साकारण्यात आलेला गणपती असेच सारे काही पाहताना आश्चर्य वाटते. हे संपूर्ण संग्रहालय न्याहाळताना एखाद्या तीर्थस्थानीच आलो आहोत असा प्रत्यय येतो.