अमरावती -शहरात कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, असे असताना महापौरांच्या साईनगर प्रभागात चक्क महापौर चषक क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी या प्रकराची त्वरित दाखल घेत महापौरांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे.
महापौरांविरोधात घोषणाबाजी
युवक काँग्रेस आणि एनएसयुआय कार्यकर्ते थेट महापौरांच्या दालनात धडकले. लग्नात 20च्यावर लोकांना परवानगी नाही, सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले असताना तुम्ही क्रिकेट सामने कसे काय आयोजित केले असा जाब युवक काँग्रेसचे अमरावती शहर अश्याक्ष निलेश गुहे यांनी महापौरांना विचारला. यावेळी महापौरांनी कुठलेही उत्तर न देता युवक काँग्रेसकडून त्यांच्या मागणीचे निवेदन मागितले आहे. यावेळी महानगरपालिकेच्या आवारात महापौरांविरोधात युवक काँग्रेस आणि एनएसयुआयच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी घोषणा दिल्या. यावेळी महापौरांनी राजीनामा द्यावा, असे फलकही झळकविण्यात आले.
हेही वाचा -अनिल देशमुखांवर १०० कोटींचा आरोप ते राजीनामा; संपुर्ण घटनाक्रम वाचा एका क्लिकवर