अमरावती - माणसाला पिण्याचे पाणी मिळणे कठीण झाले असल्याने शेतात पाणी कुठून द्यायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. शेतात पाण्याअभावी संत्र्यांची झाडेही सुकली आहेत. अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यात जळका जगताप, आमला विश्वेश्वर या भागात संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडले असून आता पोटापाण्यासाठी शेती करण्याऐवजी बाहेर काम शोधण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
अमरावती जिल्ह्यात पाण्याअभावी संत्र्याची झाडे सुकली; शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका - संत्र्याची झाडे
संत्रा शेतीला पाणी मिळत नसल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बागा सुकून चालल्या आहेत. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.
गतवर्षी झालेला अपुरा पाऊस आणि यावर्षी प्रचंड तापमानामुळे वरूड मोर्शीतील काही भागात तसेच अमरावती, चांदुर रेल्वे तालुक्यात संत्रा झाडे जळून गेली आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील जळलेली संत्र्यांची झाडे तोडून टाकली आहेत.
चांदुर रेल्वे तालुक्यातील जळका जगताप या गावातील शेतकरी अतुल जुंबळे यांनी त्यांच्या शेतात २५० संत्रा झाडे लावले होते. गतवर्षी त्यांना ३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. यावर्षी कडाक्याच्या उन्हात त्यांच्या शेतातील संत्रा झाडे सुकली आहेत. सुकलेली शंभर झाडे त्यांनी कापून टाकली. आताही उर्वरित दीडशेपैकी अनेक झाडे ही उन्हाने भाजून गेली आहेत. जी झाडे आणखी वीस वर्षे टिकली असती ती आताच नष्ट झाली आहेत. यावर्षी समस्या बिकट असून रोजी-रोटीसाठी त्यांना आता दुसऱ्याकडे कामावर जाण्याशिवाय पर्याय नाही,अशा वेदना अतुल जुंबळे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना व्यक्त केल्या.