अमरावती :अवकाळी पावसामुळे संत्रा उत्पादन अडचणीत आले आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. संत्रा उत्पादनामुळे विदर्भातील कॅलिफोर्निया अशी ओळख असणाऱ्या वरुड आणि मोर्शीसह चांदूरबाजार अचलपूर तालुक्यातील संत्रा उत्पादकांना संत्रा लागवडीसाठी वर्षाकाठी एकरी दीड लाख रुपये खर्च येत आहे. उत्पन्न मात्र 15 हजार रुपये इतके तुटपुंजे यायला लागल्यामुळे या संपूर्ण भागातील संत्रा उत्पादक प्रचंड संकटांचा सामना करीत आहे. संत्र्यामुळे वरुड, मोर्शी,चांदूरबाजार, अचलपूर तालुक्यात अनेक शेतकरी समृद्ध झाले.
संत्र्याचा व्यापार म्हणजे अलीबाबाची गुफा :संत्र्यामुळे शेतकऱ्यांचे घरे सिमेंटची झाली. संत्र्यामुळे या परिसरातील शेतकरी समृद्ध जीवन जगायला लागले, ही वास्तविकता असली तरी आता पंधरा वर्षांपासून मात्र संत्रा जीवघेणा ठरतो आहे, अशी वेदना संत्रा उत्पादक शेतकरी सतीश भटकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली. आज मात्र संत्रा उत्पादकांची जमीन पडीक म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. या परिस्थितीसाठी बऱ्याच अंशी शासन जबाबदार आहे. संत्र्याच्या झाडाला कुठलेही संरक्षण नाही. आज संत्र्याचा व्यापार हा अलीबाबाची गुफा झाली आहे. आज संत्रा उत्पादकांना अगदी कवडीमोल दरात संत्रा विकावा लागतो, अशी परिस्थिती आहे.
शासनाच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम :पूर्वी विदर्भात कापूस हेच मुख्य पीक घेतले जायचे. कापसाला भाव न मिळाल्यामुळे या भागातील शेतकरी खचले. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आत्महत्या होऊ लागली. आता मात्र कापसाप्रमाणे संत्रा देखील शेतकऱ्यांना दगा देत आहे. यामुळे आमच्यासमोर कठीण परिस्थिती निर्माण होणार, अशी भीती अनेक संत्रा उत्पादक व्यक्त करीत आहेत. संत्राबाबत सरकारचे चुकीचे धोरण देखील या परिस्थितीसाठी कारणीभूत असल्याचा आरोप संत्रा उत्पादकांकडून केला जातो आहे.