महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विदर्भाच्या 'कॅलिफोर्निया'तील संत्रा उत्पादकांसह व्यापारीही संकटात; संत्र्याचे भाव कोसळले - अमरावती संत्रा व्यापारी न्यूज

विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी तालुक्याची ओळख आहे. कारण या भागात सर्वाधिक संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. याच भागतील संत्र्यामूळे नागपूरला ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते. यावर्षी मात्र, संत्रा उत्पादक शेतकरी गारद झाला आहे. संत्र्याचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यावर ही वेळ आली आहे.

oranges
संत्री

By

Published : Dec 7, 2020, 1:24 PM IST

अमरावती -विदर्भाचा 'कॅलिफोर्निया' म्हणून अमरावती जिल्ह्याची ओळख आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्ह्यात वरुड, मोर्शी व अंजनगाव सुर्जी तालुक्यात संत्र्याचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. संत्रामध्ये व्हिटॅमीन 'सी' असल्याने कोरोना काळात संत्र्याला चांगली मागणी होती. मात्र, सध्या संत्रा उत्पादन कवडीमोल भावात विकले जात आहे. मागील वर्षी ३० हजार रुपये टनांनी विकला जाणारा संत्रा यावर्षी १२ हजार रुपयांनी घेण्यासाठी सुद्धा कुणी व्यापारी तयार नाही. संत्रा उत्पादकांना जसा फटका बसला आहे, तसाच फटका संत्रा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही बसला आहे. परिणामी अमरावतीतील संत्र्याचे अर्थकारण बिघडले आहे. लाखो रुपयांचे नुकसान येथील संत्रा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी सोसत आहेत.

अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक आणि व्यापारी दोघेही संकटात सापडले आहेत
दुष्काळामध्ये तोडली झाडे -

दोन वर्षां अगोदर अमरावतीतील मोर्शी, वरुड या परिसरात पाण्याचा मोठा दुष्काळ पडला होता. त्यामुळे अनेकांनी आपल्या शेतातील संत्र्यांची झाडे मोडली. काही, शेतकऱ्यांनी कठीण परिस्थितीमध्येही आपली झाडे जगवली. भविष्यात संत्र्याला चांगला भाव येईल, या आशेत शेतकरी होता. मात्र, अचानक संत्र्याचे भाव कोसळले आणि शेतकऱ्यांचे संत्रा उत्पादन शेतातच राहिले. त्यामुळे आता संत्रा उत्पादकांनी सोयाबीन, कापूस पिकांप्रमाणे संत्र्यालासुद्धा हमीभाव द्यावा, अशी मागणी सरकारकडे केली आहे.

दरवर्षी एक झाड तयार करण्यासाठी लागतो 350 रुपये खर्च -

संत्रा तयार करण्यासाठी प्रति झाड 350 रुपये खर्च लागतो. म्हणजे अडीच हजार झाडे असतील तर 12 लाख रुपयांचा खर्च एका शेतकऱ्याला होतो. सध्या बहुतांशी शेतकऱ्याच्या संत्रा बागा पूर्णपणे बहरल्या आहेत. मात्र, व्यापारी 12 ते 14 हजार टन भाव देत आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

'ही' आहेत भाव कोसळण्याची कारणे -

वरुड येथील संत्रा व्यापारी शेख अकरम सांगतात, 'यावर्षी संत्र्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे. सुरुवातीला संत्र्याला रंग नव्हता परंतु आता सर्व संत्रा एकाच वेळी काढणीला आला आहे. त्यामुळे संत्राची आवक प्रचंड झाली आहे. त्या तुलनेत बाजारपेठेत मागणी मात्र, घटली आहे. अमरावतीतील संत्री प्रामुख्याने दिल्ली, बांगलादेश, केरळ, मुंबई आदी ठिकाणी जातो. पण तिथेही मागणी घटली आहे. सुरुवातील भाव चांगले असल्याने आम्ही संत्रा बगीचे खरेदी करून घेतले. आता तो संत्रा बाजारात विकण्याची वेळ येताच भाव कोसळले आहेत. त्यामुळे यंदा लाखो रुपयाचा तोटा झाला आहे.'

हमीभाव देण्यात यावा -

'माझ्याकडे एकूण २२ एकर शेती आहे. त्यात अडीच हजार संत्र्याची झाडे आहेत. मागील वर्षी ३९ रुपये प्रति किलो दराने आम्ही संत्रा विकला होता. यावर्षी मात्र व्यापारी यायला तयार नाही. एक व्यापारी आला होता त्याने १२ रुपये प्रति किलोने संत्रा मागितला. त्यात मागील वर्षी पेक्षा यंदा गळती जास्त झाल्याने त्याचाही फटका आम्हाला बसला आहे. ज्याप्रमाणे कापूस ,तूर, सोयाबिनला हमीभाव आहे त्याप्रमाणे संत्रा फळालाही हमीभाव द्यावा,' अशी मागणी राजू ढोरे या संत्रा उत्पादक शेतकऱ्याने केली आहे.

पीक विमा योजनेचा फायदा होणे गरजेचे -

सध्या आंबीया बहाराची तोड सुरू आहे. पण केवळ १०-१५ रुपये किलोचा भाव मिळत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना चांगली आहे. मात्र, आता विमा कंपन्यांनी अनेक बाबींमध्ये बदल केल्याने संत्रा उत्पादकांना फटका बसला असल्याचे शेतकरी प्रणित कुबडे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details