अमरावती - विदर्भातील संत्रा अर्थात नागपुरी संत्री असं नुसतं नाव जरी काढलं तरी अनेकांना या भागातील संत्रा फळाबद्दल आकर्षक वाटते. परंतु ही संत्री पिकवणारा शेतकरी मात्र सलग चौथ्या वर्षी मेटाकुटीला आला आहे. त्याच मुख्य कारण म्हणजे संत्रा बागांना लागलेली गळती. मागील दोन महिन्यांपासून अति पावसामुळे विदर्भातील नागपूर, अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी हलाकीच्या परिस्थितीमध्ये सापडला आहे. सुरुवातीला हजारो संत्रा फळांनी बहरलेल्या संत्रा झाडावर मात्र आता निम्या पेक्षाही कमी संत्री शिल्लक नाही. त्यात शेतात जाणाऱ्या पाणंद रस्त्यांची परिस्थिती बिकट असल्याने कुठलेच वाहन संत्रा बागापर्यत जात नाही. त्यामुळे व्यापारीही शेताकडे फिरकत नाही. मग संत्रा कोण खरेदी करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशीच परिस्थिती राहिली तर संत्रा बागा पूर्ण खाली येण्याला उशीर लागणार नाही.
संत्रा गळीतीचे हे आहेत कारण
मागील चार वर्षापासून संत्रा बागांना पाऊस हा क्षमतेपेक्षा जास्त होत आहे. त्यामुळे संत्राचे देठ सुकण्याचे प्रमाण वाढले आहे. बुरशीमुळे फंगस देखील वाढले आहेत. त्यात संत्राचे दिवस पूर्ण झाल्याने बुरशी वाढली आहे. त्यामुळे गळती वाढली आहे. संत्राची मोठ्या प्रमाणावर होत असलेली गळती थांबवण्यासाठी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी हजारो रुपयांची महागडी फवारणी केली. पण गळत मात्र थांबली नसल्याचे संत्रा उत्पादक शेतकरी दिवाकर ठोंबरे यांनी सांगितले.
सुरवातीला झाडावर 20 कॅरेट संत्रा होते -
संत्रा फुटायला सुरुवात झाली तेव्हा जवळपास एका झाडावर वीस कॅरेट संत्री होती. परंतु आता मात्र आठ कॅरेट सुद्धा संत्री शिल्लक नाही. दरवर्षी दसरा सणापर्यंत संत्रा उत्पादक शेतकरी आपल्या संत्र्याच्या बागा विकून मोकळी होत असतात. परंतु दसरा उलटून सुद्धा जिल्ह्यातील हजारो संत्रा बागा विकायचा बाकी आहे.