अमरावती :लंपी प्रतिबंधासाठी गोवंशीय गुरे व म्हशी यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यास मनाई करण्यात आली होती. तथापि, आता सर्वदूर लसीकरण झाल्याने व आजाराचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने परवानगी देण्यात आली. ( vaccinated cattle will be transported ) त्यामुळे नियंत्रित क्षेत्रातील संक्रमित नसलेल्या जनावरांची जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर वाहतूक करता येणे शक्य झाले आहे. या वाहतुकीसाठी सक्षम प्राधिका-याचे आरोग्य प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
बाजार खुले; पण शर्यतीसाठी परवानगी आवश्यक :गोजातीय प्रजातीच्या गुरे व म्हशींचा बाजार भरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. तथापि, प्राण्यांच्या शर्यती आयोजित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची पूर्व परवानगी आवश्यक राहणार आहे.
बाधित जनावरांसाठी मनाई कायम :म्हशी वगळता अन्य बाधित असलेल्या गोजातीय प्रजातीच्या कोणत्याही जिवंत किंवा मृत गुरांच्या संपर्कात आलेली वैरण, निवा-यासाठी वापरलेले गवत, शव, कातडी, अन्य साहित्य कुठेही नेता येणार नाही. तसेच, म्हशी वगळता अन्य बाधित गुरांना बाजारात, जत्रेत, प्रदर्शनात किंवा अन्य प्राण्यांच्या कळपात आणण्यास मनाई करण्यात आली आहे. म्हशींमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव न आढळल्याने म्हशींना या आदेशातून वगळण्यात आल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुरूषोत्तम सोळंके यांनी स्पष्ट केले आहे.