अमरावती - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता राज्यासह देशात संचारबंदी सुरू आहे. वैद्यकीय क्षेत्र हे अत्यावश्यक सेवेमध्ये येते. पण, अमरावतीतील अनेक डॉक्टरांनी कोरोनाच्या भीतीने आपापली दवाखाने बंद केली आहे. केवश जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणजेच इर्विन रुग्णालयच रुग्णांच्या सेवेसाठी सुरू असल्याने एकमेव आशास्थान ठरत आहे.
अमरावतीकरांच्या आरोग्याचे एकमेव आशास्थान 'इर्विन' इर्विन हे शासकीय रुग्णालय असल्याने या रुग्णालयाकडे श्रीमंतांनी नेहमी पाठ फिरवली व खासगी रुग्णालयाकडे वळाले. पण, सध्या अमरावतीतील बहुतांश खासगी डॉक्टरांनी आपली रुग्णालये बंद ठेवली असल्याने श्रीमंतांचाही हा एकमेव आधार बनला आहे.
त्याचबरोबर बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करून संशयित आढळल्यास त्याला याच रुग्णालयातील विलगीकरण कक्षात क्वारंटाईन केले जात आहे. रुग्णालयात सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, वार्डबॉय, एवढेच नव्हे तर खासगी सुरक्षारक्षक सुद्धा रुग्णांवर चांगल्या पद्धतीने उपचार व्हावे यासाठी झटताना दिसत आहेत.
आजपर्यंतर या रुग्णालयातून उपचार करून घेण्यासाठी पाठ फिरवणारे श्रीमंत लोकही या रुग्णालयाकडे वाढत आहेत. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे नागरिकांच्या मनात शासकीय आरोग्य व्यवस्थेत विश्वास संपादन केला असल्याचे इर्विन रुग्णालयात आल्यावर पाहायला मिळते. इतर शहरातून अमरावतीत आलेल्यांची तपासणी करण्यासाठी वाढलेली गर्दी लक्षात घेता त्यांना रांगेत उभे राहताना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी इर्विन रुग्णालयात मंडप टाकला आहे. एवढेच नव्हे तर पिण्यासाठी पाण्याची सोय तसेच हात धुण्यासाठी व्यवस्थाही रुग्णालय प्रशासनाने उपलब्ध करून दिलेली पाहायला मिळते.
हेही वाचा -कोरोनाचे फटके : अमरावतीत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांनी दिला चोप