अमरावती - राज्य शासनाने आजपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला, तरी कोरोनाचे संकट कायम आहे. जिल्ह्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांची संख्या वाढायला लागली आहे. त्यामुळे, आज अमरावती शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळेत केवळ 12 विद्यार्थिनींचीच हजेरी लागली. तर, इतर बाकी शाळांमध्ये एकही विद्यार्थी फिरकला नसल्याचे दिसून आले.
बोटावर मोजण्याइतक्याच मुली शाळेत उपस्थित
शहरातील गर्ल्स हायस्कूल चौकात जिल्हा परिषद कन्या शाळा आहे. या शाळेत सकाळी 10.30 वाजल्यापासून प्रवेशद्वारावर मास्क, सॅनिटायजर, ऑक्सिमिटर, थर्मल स्कॅनर अशी सगळी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, शाळेत फक्त 12 विद्यार्थिनीच आल्या होत्या. या विद्यार्थिनींना मास्क वाटप करून अंतर ठेवून राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. 200च्या आसपास विद्यार्थिनी संख्या असताना केवळ बोटावर मोजण्याइतक्याच मुली शाळेत उपस्थित होत्या.