अमरावती: महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच काही भागात मात्र दुर्दैवी घटनाही घडत आहेत. अमरावती जिल्ह्यात शुक्रवारी सर्व दूर वादळी पावसाने धुमाकूळ घातला. जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात येणाऱ्या मलातपुर या गावात वीज कोसळल्याने एक शेतकरी जागीच ठार झाला, तर दोघेजण जखमी झाले आहेत. गोपाल करपती ( 30) असे वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तर विनायक ठाकरे आणि जगदीश मंडळे अशी जखमींची नावे आहेत.
लिंबाच्या झाडाखाली उभे असताना कोसळली विज: धामणगाव रेल्वे तालुक्यातील मलातपुर येथील रहिवासी असणारे मृतक गोपाल करपती, जगदीश मंडळे आणि विनायक ठाकरे हे तिघेही लगतच्या जळकापटाचे या गावात एका शेतात हनुमान जयंती निमित्त आयोजित महाप्रसादासाठी गेले होते. महाप्रसाद घेतल्यावर दोन वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळायला लागला. या तिघांनीही एका लिंबाच्या झाडाखाली आश्रय घेतला. यावेळी लिंबाच्या झाडावर वीज कोसळली आणि यात गोपाल करपती हे जागीच ठार झाले. तर दोन्ही जखमी व्यक्तींना धामणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.