अमरावती - मेळघाटमधील चिखलदरा तालुक्यातील एका आठ महिन्याच्या मुलाच्या पोटावर गरम विळ्याने शंभर चटके (डंबा) देण्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच, अशाच प्रकारे अंधश्रद्धेतून पोटफुगीवर उपचार म्हणून एका २६ दिवसीय चिमुकली मुलीच्या पोटावरही गरम चटके दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. चिखलदरा तालुक्यातील बारुगव्हाण या गावात ही घटना घडली आहे. दरम्यान, त्या मुलीवर चुरणी येथील आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
चिखलदरा तालुक्यातील बारूगव्हाण या गावातील सुनीता चिमोटे या महिलेच्या २६ दिवसाच्या चिमुकलीचे पोट फुगले होते. तिला रुग्णालयात नेण्याऐवजी घरीच पोटावर गरम चटके (डंबा) देण्यात आले आहे. मेळघाटात कुपोषणाची समस्या असल्याने आणि आदिवासींमध्ये असलेला अशिक्षितपणा यामुळे मेळघाटात मोठ्या प्रमाणावर विविध आजारावर पोटावर डंबा देण्याची अघोरी प्रथा आहे. या प्रथेतून आजारी लोकांना पोटावर चटके देण्यात येतात.
काही तासांपूर्वीच मेळघाटात आजारी पडल्याने एका आठ महिन्याच्या चिमुकल्याच्या पोटावर गरम विळ्याचे चटके देण्यात आले आहेत. संबंधित प्रकार चिखलदरा तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम बोरदा गावात घडला. या प्रकरणात मुलाच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चटके देण्यास प्रवृत्त करणाऱ्या महिलेलाही ताब्यात घेण्यात आले आहे.