अमरावती - नागपूर-औरंगाबाद महामार्गावरउभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रेलरला एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात रविवारी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
नागपूर-औरंगाबाद महामार्गावर अमरातीजवळ अपघात; एकाचा जागीच मृत्यू - अमरावतीमधील चांदुररेल्वे
नागपूर-औरंगाबाद महामार्गावर अमरावतीमधील चांदुररेल्वे तालुक्याजवळ एकाच दिवशी दोन अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. रविवारी रात्री झालेल्या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
सचिन प्रभाकर सरकटे, असे मृताचे नाव आहे. ट्रेलर नागपूरवरून औरंगाबादकडे जात असताना घुईखेडजवळील चंद्रभागा नदीजवळ पंक्चर झाला. त्यामुळे तो ट्रेलर त्याचठिकाणी उभा होता. रविवारी रात्री सचिन सरकटे घुईखेडवरून जवळा येथे जाण्यासाठी निघाले. त्यावेळी अंधरामध्ये ट्रेलर न दिसल्याने त्यांनी मागील बाजूने ट्रेलरला धडक दिली. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर जवळपास एका तासापर्यंत महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तळेगाव दशासर पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. एकाच दिवसातील हा दुसरा अपघात आहे.