अमरावती - अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील पंचवटी चौकामध्ये तब्बल 25 किलो जिलेटिनच्या कांड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्याचबरोबर जवळपास 200 नग डिटोनेटरही पोलिसांनी हस्तगत केले आहे. याप्रकरणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, हे जिलेटिन विहिरीतील ब्लास्टिंगसाठी वापरण्यात येत असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
जिलेटिनच्या काड्या व स्फोटके टाकून पळाले
या स्फोटक साहित्याचा कुठलाही परवाना या आरोपींकडे नव्हता. यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री अमरावतीच्या तिवसा पंचवटी चौकात पोलीस बंदोबस्त करत असताना दुचाकीस्वार हे दारू नेत असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे पोलिसांनी या दुचाकीला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु हे आरोपी काही दूर अंतरावर गेले व तेथे त्यांनी जिलेटिनच्या काड्या व स्फोटके टाकून पळून गेले.
एक ताब्यात
पोलिसांनी पाठलाग केला असता पोलिसांना हे जिलेटिन भरलेले साहित्य सापडून आले. पकडलेल्या युवकास संदर्भात पोलिसांनी माहिती घेतल्यानंतर सदर युवक सुमित अनिल सोनवणे हा सातरगावचा रहिवासी असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी या आरोपीची कसून विचारपूस केली असता त्याने 25 किलो जिलेटिन कांड्या आणि 200 डिटोनेटर असल्याचे त्याने मान्य केले.