अमरावती - जिल्ह्यातील अतिदुर्गम चिखलदरा तालुक्यातील चुरणी येथील रुग्णालयात तीन दिवसांच्या नवजात बालकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी एका अधिपारिचेकेवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत तिला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. वर्षा नवगिरे असे निलंबित करण्यात आलेल्या अधिपारिचेकेचे नाव आहे. ती मेळघाटमधील चुरणी येथील रुग्णालयात कार्यरत आहे.
काय आहे प्रकरण?
तीन दिवसांपूर्वी बुटीदा या गावातील अंजली अजय अखंडे या महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यादिवशी प्रसूती झाली बाळाचे वजन जन्मताच कमी असल्याने त्या बाळावर व महिलेवर अधिक लक्ष देण्याची गरज होती. मात्र, संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी त्यावर पूर्णतः दुर्लक्ष केल्याने या नवजात बालकाचा मृत्यू झाला, असा आरोप नागरिकांनी केला होता. त्यासाठी जबाबदार असलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शनिवारी कुटुंबीयांनी आक्रोश करत कारवाईची मागणी केली होती.
हेही वाचा -लसीकरणात महाराष्ट्राचा नवा विक्रम; आज एकाच दिवसात अकरा लाख नागरिकांचे लसीकरण!
यानंतर येथील अधिपरिचारिका वर्षा नवगिरे यांच्यावर कामात हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आला आणि त्यांना निलंबित करण्यात आले आहे.