अमरावती : दरवर्षी मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात राज्यात वणव्याची मोठी समस्या असते. यावर्षी मात्र पहिल्यांदाच राज्यातील सर्वच जंगलामध्ये एप्रिल आणि मे महिन्यात कुठेही आग लागली नाही. सध्या राज्यभर बरसणाऱ्या अवकाळी पावसामुळे हा वणवा विझला असून वनविभागाला दरवर्षी सामना करावा लागणाऱ्या मोठ्या संकटापासून दिलासा मिळाला आहे.
पावसाने मिटवली वनविभागाची चिंता : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यभर उन्हाचा पारा प्रचंड वाढला होता. यामुळे वन विभागाला जंगलांना वणव्यापासून सुरक्षित ठेवण्याबाबत चिंता वाटत होती. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सुद्धा दरवर्षी मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या वणव्याच्या समस्येचा सामना करण्यासाठी व्याघ्र प्रकल्प सज्ज झाले होते. मात्र वातावरणात अचानक बदल होऊन कडाक्याच्या उन्हाऐवजी अवकाळी पाऊस बरसायला लागल्याने जंगलाला वणवा लागण्याचा प्रश्नच राहिला नाही. यामुळे वन कर्मचाऱ्यांची मोठी चिंता मिटली असल्याचे राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य यादव तरटे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले.
डिसेंबर ते जून पर्यंत असतो फायर सीजन : जंगलात वणव्याचा सीजन अर्थात फायर सीजन हा डिसेंबर ते जून असा सहा महिन्यांचा असतो. यापैकी मार्च, एप्रिल आणि मे हे तीन महिने अतिशय धोक्याचे असतात. दरवर्षी सॅटॅलाइटच्या माध्यमातून फायर अलर्ट प्राप्त होतो. एफएसआय उपग्रहाद्वारे डेटा घेऊन संपूर्ण राज्याला याबाबत अलर्ट केले जाते. जीपीएस प्रणालीद्वारे प्रत्यक्ष जंगलात गस्त घालणारे कर्मचारी कुठे आग लागण्याची शक्यता आहे का, याची सातत्याने तपासणी करत असतात. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील मेळघाट पेंच ताडोबा नवेगाव या व्याघ्र प्रकल्पात तर टिपेश्वर, पैनगंगा, उमरखेड सारख्या अभयारण्यात आजवर लागलेल्या आगीच्या घटना ह्या मानवनिर्मित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जंगली प्राण्यांचे संरक्षण महत्त्वाचे : वणव्यामुळे जंगलाचे प्रचंड नुकसान होते. आगीमुळे संपूर्ण अन्नसाखळी धोक्यात येते. वणव्यामुळे वन्य प्राणी आणि पक्षी यांनाच जीव गमवावा लागत नाही तर साप, सरडे, मुंग्या यांसारख्या जीवांचा देखील मोठ्या प्रमाणात मृत्यू होतो. वनवा हा जंगलासाठी धोकादायक असून गवत जळाल्यामुळे तृणभक्षी प्राण्यांची उपासमार होते. त्यामुळे वाघाचे खाद्य देखील धोक्यात येते. यासंदर्भात जंगलातील रहिवाशांमध्ये जागृती करणे व कायद्याची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे यादव तरटे यावेळी म्हणाले.