अमरावती - निसर्ग संपन्न मेळघाटातील तरुणाई योग्य रोजगाराअभावी गावातून शहराकडे पलायन करत आहे. रोजगार निर्मितीकडे शासनाने विशेष लक्ष न दिल्याने गावं ओसाड पडायला सुरुवात झाली आहे. यामुळे कौंटुबिक समस्येसह लहान मुलांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे.
गावात काम मिळेना.. पोटासाठी आदिवासी मजुरांचे मेळघाटातून स्थलांतर २ ते अडीच हजार लोकवस्ती असलेल्या मेळघाटातील गावातील जवळपास ७०० ते ८०० युवकांनी रोजगारासाठी शहराची वाट धरली आहे. काही गावात हा आकडा गावातील लोकसंख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त आहे. यामुळे मेळघाटातील अनेक गावांमध्ये केवळ वृद्ध आदिवासींसोबत कामासाठी बाहेर पडलेल्या तरुणांच्या बायका आणि त्यांची लहान मुलेच फक्त दिसतात. अनेक ठिकाणी तर पती-पत्नी दोघेही कामासाठी मेळघाटाबाहेर गेल्याने वृद्ध आजी-आजोबा आपल्या नातवांचे संगोपन करताना दिसतात.
हेही वाचा -जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, ५ जणांचा जागीच मृत्यू
बाजाराच्या ठिकाणी शेळी, कोंबड्या विकून वृद्ध आदिवासी पोटाची खळगी भरतात. धायरीच्या बाजारात तर मोठ्या संख्येने आदिवासी महिला भाज्यांसह कोंबड्यांची विक्री करतात. शेती मालाला विशेष बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे शेती व्यवसाय सुरू ठेवणे आदिवासी समाजाला कठीण जात आहे.
मेळघाटातील बराचसा भाग हा आता व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट झाल्याने वनविभागाची कामेही हवी तशी राहिली नाहीत. रोजगार हमी योजनेची कामेही ठप्प आहेत. डिसेंबर महिन्यापर्यंत कसाबसा मेळघाटात रोजगार मिळतो. मात्र यानंतर कामाच्या शोधात मोठ्या संख्येने ग्रामस्थ मध्यप्रदेशात स्थलांतर करतात. त्याचबरोबर परतवाडा, चांदुर बाजार, अकोट, अमरावती, अकोला, नागपूर यासह थेट नाशिक आणि पुण्यापर्यंत हे आदिवासी रोजगारासाठी पोहोचले आहे.
हेही वाचा -अर्थसंकल्पीय अधिवेशन : दिल्ली हिंसाचारावरून काँग्रेस करणार शाहांच्या राजीनाम्याची मागणी
मेळघाटातील आदिवासी शांत स्वभावाचे असून प्रचंड मेहनती आहेत. दोन ते तीन माणसांची कामे एकच व्यक्ती करीत असल्यामुळे आदिवासी मजुरांना काम देणे अनेकांना परवडणारे आहे. मेळघाटातील कुपोषणासारख्या आजारासह विविध समस्या सोडविण्यात सरकार पुढाकार घेत असल्याची भाषा एकीकडे बोलत असताना दुसरीकडे मात्र गावांना मेळघाटातून हलवून सपाट जागेवर आणण्याचा प्रयत्न करीत आहे.
वर्षभर कितीतरी महिने परगावी काबाडकष्ठ करणारा आदिवासी मजूर मार्च महिन्यात मात्र त्यांच्या सर्वात मोठ्या सणाच्या निमित्ताने मेळघाटात परततो. आठ दिवस होळीचा धूमधडाका मेळघाटात साजरा होतो. त्यानंतर पुन्हा ही आदिवासी बांधव कामाच्या शोधात बाहेर पडतात आणि त्यांच्या जाण्याने गावं ओसाड पडतात.