अमरावती- बनमेरू महाविद्यालयाच्या कारभारावर आक्षेप नोंदवत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांच्याबर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये चौकशी समितीने प्राचार्य डॉ. बनमेरू यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, असा अहवाल दिला होता. तरीही महाविद्यालयावर कारवाई न झाल्यामुळे बनमेरू महाविद्यालयाच्या प्राचार्यांना संत गाडगे बाबा विद्यापीठाचे अभय आहे का ? अशा चर्चांना उधाण आले आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित बुलडाणा जिल्ह्यात लोणार येथे बनमेरू महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाविरोधात अनेक तक्रारी आल्यानंतर अमरावती विद्यापीठाने डॉ. एफ. सी. रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीने बनमेरू महाविद्यालयातील सर्व कारभाराची चौकशी करून प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, असा अहवाल ५ ऑक्टोबर रोजी विद्यापीठाला सादर केला होता. अहवाल सादर होऊन आता ७ महिने उलटूनही अमरावती विद्यापीठ बनमेरू यांच्यावितोधात कारवाई का करत नाही? असा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. येत्या १५ दिवसांत विद्यापीठ प्रशासनाने प्राचार्य बनमेरू यांच्यावर करावाई केली नाही तर विद्यापीठासमोर उपोषण करण्याचा इशारा गायकवाड यांनी यावेळी दिला आहे.