अमरावतीNitin Gadkari On Panjabrao Deshmukh : शिक्षणासाठी शाळा महाविद्यालयांचा प्रसार हे चांगले काम आहे. मात्र श्री शिवाजी शिक्षण संस्थेनं कृषी क्षेत्रातील संशोधन, नवा दृष्टिकोन यावर भर देणाऱ्या क्षेत्रांचा विकास कसा साधता येईल याकडं लक्ष देऊन कृषी क्षेत्रात विकासात्मक परिवर्तनाचा संकल्प केला तर देशाचे पहिले कृषिमंत्री आणि शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांना खरी आदरांजली ठरेल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंती उत्सव सोहळ्याला नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार प्रामुख्याने उपस्थित होते.
शरद पवारांना डॉ पंजाबराव देशमुख पुरस्कार: श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनं डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्ताने विविध क्षेत्रात खास कर्तृत्व बजावणाऱ्या व्यक्तींसाठी पहिल्यांदाच 'डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार' बहाल करण्याचा निर्णय घेतला. यावर्षी हा पहिला पुरस्कार देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बहाल करण्यात आला. पाच लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे. नितीन गडकरी यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने हा पहिलाच पुरस्कार शरद पवार यांना दिला. आता हा इतका मोठा पुढचा पुरस्कार देण्यासाठी पुढच्या वर्षी शरद पवारांपेक्षा मोठा माणूस कुठे शोधणार असा प्रश्न, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांना गडकरी यांनी विचारताच कार्यक्रम स्थळी सर्वत्र हास्यकल्लोळ झाला.
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने मला पुरस्कार मिळणं हे खरोखरच माझे भाग्य आहे. मात्र या पुरस्काराच्या पाच लाख रुपयांमध्ये आणखी पंधरा लाख रुपयांची भर घालून एकूण वीस लाख रुपये बँकेत टाकावेत. त्यातून येणाऱ्या व्याजाच्या रकमेतून कृषी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला शेतकऱ्याचा गौरव करावा. यासाठी मी या पुरस्काराची रक्कम उत्कृष्ट महिला शेतकऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी बहाल करतो - शरद पवार, माजी कृषीमंत्री
आज पुन्हा खेड्यात जाण्याची गरज : आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी सतत खेड्याकडे चला असे म्हणत होते. देश स्वतंत्र झाला तेव्हा देशाची 85 टक्के लोकसंख्या ही खेड्यात रहात होती. आज ग्रामीण भागात काम राहिले नसल्यामुळं कामाच्या शोधात शहराकडे आज ग्रामीण भागाची लोकसंख्या ही 55 ते 60 टक्क्यांवर आली आहे. ग्रामीण भागाची समृद्धी आणि विकासावर डॉ. पंजाबराव देशमुख यांनी खऱ्या अर्थाने भर देऊन प्रयत्न केलेत. कृषिमंत्री म्हणून ग्रामीण भागात शेतीच्या विकासासाठी पंजाबराव देशमुख यांनी केलेल्या प्रयत्नाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली. आज देखील कृषी क्षेत्रात तांत्रिक क्रांतीची गरज आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेने कृषी क्षेत्राचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल याचा विचार करून पाऊल टाकायला हवेत असे नितीन गडकरी यावेळी म्हणाले.
शरद पवार राजकारणाला समाजकारण म्हणणारा नेता: डॉ. पंजाबराव देशमुख यांची शिक्षण आणि कृषी क्षेत्राबाबत जितकी तळमळ होती तितकीच तळमळ शरद पवार यांच्यामध्ये आहे. आपण राजकारणाचा अर्थ केवळ सत्ताकारण केला आहे. राजकारण म्हणजे समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण होय. राजनिती म्हणजे समाजनीती, लोकनीती होय. त्यामुळं राजकारण हे समाजकारण आहे असं समजून आयुष्यभर कृषी, शिक्षण, कला, साहित्य, संगीत, क्रीडा सगळ्या क्षेत्राकरिता आणि यातल्या टॅलेंटच्या मागे खंबीरपणे उभे राहणारं महाराष्ट्रातलं नेतृत्व म्हणजे शरद पवार आहेत, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं, तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. संध्याकाळ होत असल्यामुळं आणि दिल्लीला परत जायचं असल्यामुळं नितीन गडकरी यांनी शरद पवार आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांची माफी मागून कार्यक्रमातून रजा घेतली.
ऑक्सफर्ड मधून शिकलेला माणूस शेतीकडे वळला हे नवलच : डॉ. पंजाबराव देशमुख हे ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिकून आले होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात देशाचे पहिले कृषिमंत्री म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख यांनी काम केलं. ऑक्सफर्ड मधून शिकून आलेल्या व्यक्तीने पुढे आपलं संपूर्ण आयुष्य कृषी क्षेत्रात वाहून घेतले, ही साधी बाब नाही असं शरद पवार म्हणाले. शेतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या शिक्षणासाठी आयुष्य देणारे डॉ. पंजाबराव देशमुख खरोखरच एक महान व्यक्ती होते असं देखील शरद पवार म्हणाले.
हेही वाचा -
- गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टीक सेंटरचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन, काय म्हणाले एकनाथ शिंदे?
- कोणाला आरक्षण दिलं पाहिजे? केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं
- Nitin Gadkari Extortion Case : नितीन गडकरी खंडणी प्रकरण; आरोपी जयेश पुजारीनं गिळली तार, रुग्णालयात दाखल