अमरावती - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अमरावती शहरात मात्र कुठलाही धाक नसल्याप्रमाणे रस्त्यावर नागरिक मुक्तपणे संचार करीत आहेत. सकाळपासून रात्रीपर्यंत गर्दी ओसरायचे नाव घेत नसल्याने हा कसला लॉकडाऊन हा प्रश्न निर्माण होत आहे.
कोरोनाच्या या संकट काळात भाजी, औषधी, दूध या अत्यावश्यक सेवांसाठी नागरिकांना बाहेर पडण्याची मुभा आहे. मात्र, दिवसभर कुणाचाही धाक नसल्याचा परिणाम जाणवत आहे. भाजी खरेदी करणाऱ्यांपेक्षा विक्रेत्यांची गर्दी जास्त दिसून येत आहे. अतिशय गजबजलेल्या पंचवटी चौकापासून ते भाजी विक्रेत्यांनी फूटपाथवर दुकान थाटली आहेत. गडगेनगर, शेगावनाका ते अगदी कठोरा नाका अशी एकूण 3 किमी पर्यंत भाजी विक्रेते रस्त्यावर आहेत. असेच चित्र फरशी स्टॉप, दस्तुर नगर आणि यशोदगर नगर परिसरातही आहे. साई नगर, चपराशीपुरा आणि बियाणी चौकातही हेच दिसून आले. पोलिसांची ड्युटी मुख्य चौकात दिवसभर लावण्यात आली आहे.