अमरावती - फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाई वाटून शहरात नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. कडाक्याची थंडी असतानाही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहरवासियांमध्ये विशेष असा उत्साह पाहायला मिळाला. तर नवीन वर्षाच्या स्वागतादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.
शहरातील विविध सामाजिक संघटनांनी 31 डिसेंबरच्या रात्री रस्त्यावर तनात असणार्या पोलिसांसाठी चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली. 'नवीन वर्षाचे स्वागत आनंदाने करा. मात्र, कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्या'. असा सल्ला पोलिस आयुक्त संजय बाविस्कर यांनी शहरवासियांना दिला.
मंगळवारी सायंकाळपासूनच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहर सज्ज झाले होते. गत 4 दिवसांपासून कडाक्याची थंडी पडली असताना नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मात्र शहरवासियांमध्ये ऊर्जा पाहायला मिळाली. शहरातील सर्व मोठ्या हॉटेलमध्ये नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यासह विविध ठिकाणी नाचगाण्याच्या कार्यक्रमांसह नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले.