अमरावती - ओल्या दुष्काळामुळे हतबल आलेल्या अमरावती विभागातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून त्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढला. यावेळी विभागीय आयुक्त पियुष सिंह सुट्टीवर असल्याने अप्पर जिल्हाधिकारी संजय पवार यांना या महिलांनी निवेदन दिले.
खरीप पिकांसाठी एकरी 20 हजार रुपये तर, संत्रा उत्पादकांना एकरी 40 हजार रुपये मदत देण्यात यावी, पीक विम्याची रक्कम तत्काळ मिळावी, सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, शेतकामांना रोजगार हमी योजनेत प्राधान्य देऊन शेतमजुरांना तत्काळ काम उपलब्ध करून देण्यात यावे, आधारभूत विक्री शुल्कानुसार शेतमालाची खरेदी सुरू करण्यात यावी, शासकीय कापूस खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्यात यावे, शेतमजुरांच्या मुलांचे शैक्षणिक परीक्षा शुल्क माफ करावे यांसह इतर मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश प्रभारी सुरेखा ठाकूर यांनी दिले.