अमरावती :मी आज विमानाने येत असताना मला नाशिक पासून नागपूर पर्यंत समृद्धी महामार्ग दिसला. या समृद्धी महामार्गाने राज्याच्या औद्योगिक विकासाला निश्चितच गती येईल यात कुठलीही शंका नाही. मात्र, या समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांची सुपीक जमीन गेली हे वास्तव आहे. आज अमरावती एमआयडीसीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. या उद्योगांसाठी देखील जी काही जमीन गेली ती शेतकऱ्यांचीच होती. आज पंजाब, हरियाणामध्ये शेतीची मुबलक जमीन टिकून आहे. पाण्याचा साठा देखील भरमसाठ आहे, पाण्याची कमी असून होती नव्हती ती सुपीक जमीन हातची गेली. हेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दुर्दैव असल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते आज अमरावती शहरात आयोजित कृषी पदवीधर संघटनेच्या प्रथम राज्यस्तरीय अधिवेशनाला संबोधित करीत होते.
शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे उडाली झोप : मी देशाचा कृषिमंत्री असताना विदर्भात वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या करीत असताना माझी अक्षरशः झोप उडून गेली होती. मी त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना माझ्यासोबत विदर्भात चालण्याची विनंती केली. पंतप्रधानांनी माझ्यासोबत विदर्भाचा दौरा केला. यवतमाळ जिल्ह्यात ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मुलीचे लग्न ठरले असताना शेतीसाठी सावकाराकडून घेतलेले कर्ज फेडणे शक्य होत नसल्यामुळे आणि सावकार पैशासाठी तगादा लावत असल्यामुळे त्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे कळताच आम्हाला धक्का बसला. आम्ही त्यावेळी तात्काळ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी योजना आखली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले अशी माहिती यावेळी शरद पवार यांनी दिली.
कृषिमंत्री झालो :भारताचा कृषिमंत्री म्हणून मी शपथ शपथ घेतली आणि माझ्या निवासस्थानी पोहोचलो असताना कृषी विभागाच्या सचिवाने माझ्यासमोर एक फाईल ठेवली. देशात केवळ वर्षभर पुरेल इतकाच धान्यसाठा उपलब्ध असल्याचे सचिवांनी सांगितले. यामुळे परदेशातून धान्य आयात करावी लागेल. यासाठी या फाईलवर स्वाक्षरी करावी असे तो मला म्हणाला. मात्र, मी त्या फाईलवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी मला देशात लोकांना खायला धान्य नाही, ही गंभीर परिस्थिती असल्याची माहिती दिली. दुर्दैवाने मला परदेशातून धान्य आयात करण्यासाठीच्या फाईलवर स्वाक्षरी करावी लागली. धान्य आयात करण्यासंदर्भात मी केलेली स्वाक्षरी मला सतत पोचत होती. मात्र 2014 मध्ये मी मंत्रीपद सोडले त्यावेळी भारत जगात तांदुळाच्या निर्यातीत पहिल्या क्रमांकावर, गव्हाच्या निर्यातीत दुसऱ्या क्रमांकावर होता. याचा मला प्रचंड अभिमान वाटत असल्याचे देखील शरद पवार यांनी यावेळी सांगितले.