अमरावती - शहरवासियांचे श्रद्धास्थान असलेल्या आई अंबादेवीच्या अभिषेकाने आज (रविवारी) शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. पहाटे चार वाजतापासूनच अंबादेवी आणि एकवीरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली.
अमरावतीमध्ये अंबादेवीच्या अभिषेकाने नवरात्रोत्सवाला प्रारंभ... हेही वाचा -लोकांनी आता ठरवलंय - खासदार सुनिल तटकरे
सकाळी पाच वाजता आंबा मातेला अभिषेक करण्यात आला. यावेळी अंबादेवीचा गाभारा फुलांनी सजविण्यात आला होता. सकाळी सहा वाजता देवीची आरती झाली. पहिल्याच दिवशी शहरातील विविध भागातून पायी चालत येऊन भाविकांनी अंबादेवी आणि एकवीरा देवीचे दर्शन घेतले. मंदिराच्या परिसरात सकाळपासूनच भजन आणि किर्तनाला ही सुरुवात झाली. आजपासून (रविवारी) सुरू झालेला उत्सव दसऱ्यापर्यंत चालणार आहे.
हेही वाचा -मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार
नवमीला देवीच्या दर्शनासाठी सर्वाधिक गर्दी उसळते. संपूर्ण नवरात्रोत्सव काळात जवळपास 12 लाखांच्यावर भाविक देवीचे दर्शन घेणार असा अंदाज आहे. नवरात्र उत्सवानिमित्त अंबादेवी मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. भाविकांना देवीचे दर्शन घेता यावे, यासाठी दोन्ही मंदिरांमध्ये महिला आणि पुरुषांची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसही देवीच्या मंदिरासह संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण राहते.