कौडण्यपूरच्या अंबिका देवी मंदिरात नवरात्रोत्सव अमरावती: पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व असणारे कौडण्यपूर हे पूर्वी कुंडलपूर या नावाने ओळखले जाते. महाभारत काळात रुक्मिणी नावाच्या राज्याचे कुंडलपूरला राज्य होते. त्याची मुलगी रुक्मिणी हिचा विवाह शिशुपालची निश्चित करण्यात आला होता. मात्र रुक्मिणीला तो मान्य नव्हता. तिने आपले हरण करावे असा निरोप भगवान श्रीकृष्णाला पाठवला. ठरल्याप्रमाणे रुक्मिणी माता लग्नाची हळद अंबिका देवीला वाहण्यासाठी मैत्रिणींसह या अंबिका मंदिरात आली असताना, या मंदिरात असणाऱ्या भुयारातून भगवान श्रीकृष्णांनी रुक्मिणीचे हरण केले होते.
भुयारातून रुक्मिणी मातेचे हरण: कौडण्यपूर येथील अंबिका देवी मंदिरातील भुयार थेट अमरावती शहरात असणाऱ्या अंबादेवी मंदिर परिसरातील श्री एकविरा देवी मंदिरात निघतो. सुमारे 35 किलोमीटरचा हा भुयार पार करून भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणी मातेचे हरण केले होते. स्वतः भगवान श्रीकृष्ण या अंबिका मातेच्या मंदिरात आले असल्यामुळे या मंदिराला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. मंदिरात आज देखील अंबिका मातेच्या गाभाऱ्यात जाण्यापूर्वी भाविक रुक्मिणी हरण खिडकीजवळ नतमस्तक होतात. अंबिका देवीच्या दर्शनासाठी अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील सर्व जिल्हे तसेच मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश या जिल्ह्यातून देखील मोठ्या संख्येने भाविक येतात अशी माहिती अंबिका देवी संस्थानचे विश्वस्त डॉक्टर योगेश धरमठोक यांनी दिली.
नवरात्रचा मोठा उत्सव:चैत्र आणि अश्विन महिन्यात अंबिका देवी मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. आता गुढीपाडव्यापासून चैत्र महिन्यातील नवरात्रउत्सव या मंदिरात साजरा होतो आहे. मंदिरात रामनवमीपर्यंत नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे. अनेक शतकांच्या परंपरेनुसार या मंदिरात अखंड दिवे लावण्यात आले आहे. हे अखंड दिवे पेटविणाऱ्या महिलांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. सुमारे 1100 दिवे या नवरात्रोत्सव काळात अखंडरित्या पेटत आहेत.
श्रीक्षेत्र कौडण्यपूरचे महत्त्व: पुरातन काळात वशिष्ठ ऋषिंनी तब केल्यामुळे वर्धा नदी ही वशिष्ठ नावाने, तसेच श्री अमरीश ऋषीचे पुत्र कुंडन अर्थात कौंडण्य ऋषींनी तब केल्यामुळे या तपोवनलापूर नाव प्राप्त झाले. श्री रामाची आजी आणि राजा दशरथची आई इंदुमती, नलराजाची राणी दमयंती, श्री अगस्ती ऋषीची पत्नी लोपामुद्रा, राजा भिमककन्या माता रुक्मिणी, स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आणणाऱ्या श्री भागीरथ राजाची माता केशिनी, या पंचायतीचे माहेर तसेच नात संप्रदायातील श्री चौरंगीनाथ या सर्वांचे स्थान कौडण्यपूरच आहे. नाथांची समाधी सुद्धा याच ठिकाणी आहे. याशिवाय इसवी सन 1200 पूर्वी श्री गणपती व व पंचमुखी महादेवाची पिंड देखील कौडण्यपूर येथे आहे. वर्धा नदीच्या पात्रात पुंडलिक नावाचे कुंड आहे. याच कुंडातून संत सखाराम महाराजांना श्री पांडुरंगाची मूर्ती प्राप्त झाली. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून या ठिकाणी भव्य मंदिर उभारण्यात आले आहे.
1928 मध्ये पहिल्यांदा झाले संशोधन: कौडण्यापुर येथे पुराण वस्तू संशोधनाचा पहिला प्रयत्न 1928 मध्ये एआर रानडे यांनी केला. त्यानंतर 1936 मध्ये पुरातत्त्व विभागाचे प्रमुख रायबहादूर श्री केएन दीक्षित यांनी केला. 1962 मध्ये पुरातत्व विभागाचे संचालक डॉक्टर मोरेश्वर दीक्षित यांनी देखील या ठिकाणी संशोधन केले होते. तसेच या ठिकाणी झालेल्या उत्खननातून मिळालेल्या वस्तूंवरून या वस्तू ताम्र व पाषाण युगातील असाव्यात असे समजले जाते. दहा हजार वर्षांपूर्वीची शेषशाही विष्णू भगवानाची पाषाणमूर्ती देखील विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरात ठेवण्यात आली आहे. या मंदिराचे महत्त्व वाढविण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगे महाराज तसेच अच्युत महाराज यांचा महत्त्वाचा वाटा आहे. या ठिकाणी सातवाहन काळातील काही नाणी व मातीची भांडी देखील उत्खननात सापडली आहे.
कौडण्यपूरचे मौर्यकालीन पुरावे आढळले: कौडण्यपूरचे पौराणिक महत्त्व असले तरी काही वर्षांपूर्वी झालेल्या पुणे येथील डेक्कन कॉलेज तसेच नागपूर येथील पुरातत्त्व विभागाच्या पथकाने केलेल्या सर्वेक्षणादरम्यान कौडण्यपूर येथे मौर्यकालीन बौद्ध स्तूप, विहार आढळून आले आहेत. या ठिकाणी आणखी संशोधन होणे आवश्यक असल्याचे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. संतोष बनसोड यांनी सांगितले आहे.
हेही वाचा: Virgavhan Hanuman Mandir समर्थ रामदास स्वामींनी स्थापित केलेली विरगव्हाण येथील हनुमान मूर्ती वाचा मंदिराचे महात्म्य