महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Navratri २०२३ : अंबा-एकवीरा देवी मंदिरात नवरात्र उत्सवाला प्रारंभ - Amravati Navaratri Festival

Navratri २०२३ : विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अमरावतीत लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या अंबा-एकवीरादेवी मंदिरात (Amba Ekvira Devi Temple) घटस्थापना करण्यात आली. यानंतर नवरात्रोत्सवाला (Amravati Navaratri Festival) प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी भाविकांनी अंबा-एकवीरादेवी मंदिरात अलोट गर्दी केली होती.

Navratri Utsav In Amravati
श्री अंबादेवी

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 15, 2023, 7:16 PM IST

अमरावतीच्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ

अमरावती Navratri २०२३ : विदर्भाची कुलदैवत आणि अमरावतीची ग्रामदैवत असणाऱ्या अंबादेवी आणि एकविरा देवीला (Amba Ekvira Devi Temple) आज पहाटे चार वाजता सहस्त्रधारा अभिषेक आणि पूजा आरती करून नवरात्रोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. नवरात्रोत्सवाच्या (Amravati Navaratri Festival) पहिल्याच दिवशी पहाटे चार वाजल्यापासून देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.



सात तास चालला पूजा विधि: श्री अंबादेवी मंदिरात आज पहाटे चार वाजल्यापासून घटस्थापनेच्या विधीला प्रारंभ झाला. पहाटे देवीला दही, दूध, मध, पाणी अशा विविध सहस्त्रधारांनी अभिषेक करण्यात आला. यानंतर घटस्थापनेला प्रारंभ झाला. श्री अंबादेवी आणि श्री एकविरा देवी (Ekvira Devi Amravati) या दोन्ही मंदिरात समान विधी करण्यात आले. श्री अंबादेवी आणि श्री एकवीरा देवी या दोन्ही मंदिरात घटस्थापना विधी पूर्ण करण्यात आला. दोन्ही मंदिरातील पुजारी आणि विश्वस्तांनी आपापल्या देवींची ओटी ही एक दुसऱ्या देवीच्या मंदिरात जाऊन गाभाऱ्यात अर्पण केली. दोन्ही देवींना ओटी भरण्याचा सोहळा आटोपल्यावर दोन्ही मंदिरांमध्ये आरती करण्यात आली. आरती झाल्यावर अंबादेवीला साज चढविण्यात आला. विविधरंगी 15 साड्या आणि त्यानंतर दागिने आणि फुलांनी सुमारे अडीच तासापर्यंत श्री अंबादेवीला पुजाऱ्यांनी साज चढविला.



असा आहे अंबादेवी मंदिराचा इतिहास : विदर्भाची कुलदैवत आणि अमरावतीची ग्रामदैवत असणारी अंबादेवी सुमारे पाच हजार वर्षांपासून अमरावतीत आहे. पूर्वी गावाबाहेर असणारे आणि आज शहराच्या मध्यभागी असलेले अंबामातेचे अति प्राचीन मंदिर आहे. अंबामातेच्या मंदिराशेजारीच एकवीरा देवीचं ही मंदिर आहे. 1499 मध्ये यवनांनी वऱ्हाडवर कब्जा केला. त्यावेळी अनेक मंदिरांपैकी अंबा देवीचे सुवर्ण मंदिरही त्यांनी लुटले असा इतिहासात उल्लेख आहे. अंबादेवीच्या मंदिरात मात्र यवन पोहोचू शकले नाहीत. 1630 साली देवीचे भक्त जनार्दन स्वामी यांनी अंबादेवी मंदिराचा जीर्णोद्धार केला. अंबादेवी मंदिरालगतच एकवीरा देवी मंदिराची स्थापना करण्यात आली. विशेष म्हणजे एकवीरा देवीला मोठ्या देवीचा आणि अंबा देवीला लहान देवीचा मान आहे.



अंबादेवी मंदिराला नर्तकींनी केली होती भरीव मदत : अंबादेवी मंदिराचा जीर्णोद्धार 1898 मध्ये करण्यात आला. त्यावेळी मंदिर परिसरात राहणाऱ्या नर्तकींनी भरीव आर्थिक मदत केली होती. सोन्याचे दागिने देखील देवीला अर्पण केले होते. मंगळसूत्र, बोरमाळा, नथ, कंबरपट्टा, एकदाणी, बाजूबंद, बिंदी असे नानाविध अलंकार अंबादेवीला आहेत. आज या दागिन्यांचा संपूर्ण साज अंबादेवीला चढविण्यात आला.



पहाटे पूजेला मान्यवरांची उपस्थिती :आज पहाटे मंदिरात घटस्थापनेचा विधी सुरू असताना अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी आणि महापालिका आयुक्त देविदास पवार हे प्रामुख्याने उपस्थित होते. श्री अंबादेवी मंदिर संस्थानचे सचिव दीपक श्रीमाळी यांनी सपत्निक घटस्थापना केली. मंदिराचे विश्वस्त अ‍ॅड. राजेंद्र पांडे, विलास मराठे, दीपिका खांडेकर, रवींद्र कर्वे प्रामुख्याने उपस्थित होते.



अमरावती शहरात उत्साहाचे वातावरण : नवरात्रोत्सवानिमित्त शहरात आज पहाटेपासूनच उत्साहाचे वातावरण आहे. पहाटे तीन वाजल्यापासूनच शहराच्या विविध भागातून अनेक महिला, युवती, युवक अंबादेवीच्या दर्शनासाठी पायी चालत निघाल्यामुळे शहरातील सर्वच भागातील रस्त्यांवर पहाटेपासूनच भाविकांची गर्दी होती.

हेही वाचा -

Shardiya Navratri 2023 : रविवारपासून करवीर निवासिनी आई अंबाबाईचा जागर; नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण

Navratri 2023 : मानाच्या तोफेच्या सलामीनं करवीर निवासिनी अंबाबाईच्या शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ

Navratri 2023 Day 1 : शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करा देवी शैलपुत्रीची उपासना; जाणून घ्या कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धती आणि रंग

ABOUT THE AUTHOR

...view details