महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेच्या गडाला नवनीत राणांनी लावला सुरुंग, ३६ हजार मतांनी अडसुळांचा केला पराभव - shivsena

अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आणि युवा स्वाभिमान आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा या विजयी झाल्या आहेत. त्यांनी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा ३६ हजार ९५१ मतांनी पराभव केला.

अमरावतीत नवनीत राणांचा विजय

By

Published : May 23, 2019, 11:33 PM IST

Updated : May 24, 2019, 6:48 AM IST

अमरावती - अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आणि युवा स्वाभिमान आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा या विजयी झाल्या आहेत. त्यांनी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा ३६ हजार ९५१ मतांनी पराभव केला. या विजयाने नवनीत राणांनी गेल्या २० वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या गड काबीज केला.

नवनीत राणा यांचा विजयोत्सव

आज सकाळी अमरावती-बडनेरा मार्गावर असणाऱ्या नेमणी गोडाऊन येथे मत मोजणीला सुरुवात झाली होती. सुरुवातीपासून ५ फेरीपर्यंय शिवसेनेचे आनंदराव अडसूळ हे १२ हजार मतांनी आघाडीवर होते. पाचव्या फेरीत पहिल्यांदा नवनीत राणा यांनी 4 हजार 886 मतांची आघाडी घेतली. ही आघाडी अखेरच्या फेरीपर्यंत कायम होती. आठव्या फेरीत नवनीत राणा यांनी थेट 17 हजार 404 मतांची आघाडी घेतल्यावर युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. बाराव्या फेरी अखेर नवनीत राणा यांनी 31 हजार 514 मतांची आघाडी घेतल्यावर नवनीत राणा यांच्या विजयाचे चित्र स्पष्ट झाले. दरम्यान आनंदराव अडसुळ यांचा पराभव निश्चित असल्याचे लक्षात येताच अडसूळ समर्थकांनी मतमोजणी केंद्रावरून काढता पाय घेतला.

अमरावतीत नवनीत राणांचा विजय

अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या अमरावती मतदारसंघात एकूण २४ उमेदार निवडणूक रिंगणात होते. बसपाचे अरुण वानखडे आणि बहुजन वंचित आघाडीचे गुणवंत देवपारे यांच्यासह इतर 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.

अमरावती मतदारसंघात 1996 साली शिवसेनेचे अनंत गुढे यांनी काँग्रेस रिपाई आघाडीचे उमेदवार रा. सु. गवई यांचा पराभव केला होता. तेव्हापासून अमरावती मतदारसंघात शिवसेनाच भगवा फडकत आहे. त्यानंतर 1998-99 ला झालेल्या निवडणुकीत रा.सु.गवई विजयी झाले होते. 1999 च्या निवडणुकीत अनंत गुढे यांनी पुन्हा एकदा अमरावतीत भगवा फडकवला होता. 2009 पर्यंत अनंत गुढे हे अमरावतीचे खासदार होते. 2009 मध्ये अमरावती मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यावर आनंदराव अडसूळ बुलडण्यातून अमरावतीत आले. 2009 मध्ये अडसूळ यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाई आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र गवई यांचा पराभव केला होता.2014 च्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी अडसुळांविरुद्ध दंड थोपटले होते. मोदी लाटेमुळे नवनीत राणा यांचा पराभव झाला होता. यावेळी मात्र नवनीत राणा यांनी संपुर्ण मतदारसंघात दांडगा जनसंपर्क वाढविला.

आनंदराव अडसूळ यांनी १० वर्षात नेमके काय केले असा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच नवनीत राणा यांनी बाहेरून आलेल्या अडसुळांपेक्षा अमरावतीच्या सुनेला संधी द्या, असे आवाहन संपूर्ण प्रचार काळात केले होते.

नवनीत राणा या अमरावतीतून निवडून आलेल्या चौथ्या महिला खासदार आहे. यापूर्वी विमलाबाई देशमुख, प्रतिभाताई पाटील, उषाताई चौधरी यांच्यानंतर अमरावती मतदातसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नवनीत राणा या अमरावतीच्या चौथ्या महिला खासदार आहेत.

Last Updated : May 24, 2019, 6:48 AM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details